घरमहाराष्ट्रबारामतीत अजित पवारांविरोधात पडळकर

बारामतीत अजित पवारांविरोधात पडळकर

Subscribe

वंचित बहुजन आघाडीला नुकतेच रामराम ठोकलेले धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी भाजपचे कमळ हाती घेतले. पडळकरांना कमळ हाती देताना भाजपने त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याविरोधात बारामतीत उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.‘गोपीचंद पडळकरांनी बारामतीमधून निवडणूक लढवावी. पुढचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. पण तयारी असेल, तर मी पक्षनेतृत्वाशी बोलतो’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी स्पष्ट केले.

गेल्या दोन दिवसांपासून भाजपच्या ज्या मेगाभरतीसंदर्भात चर्चा सुरू होती, ती मेगाभरती काही झाली नाही. मात्र मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गरवारे क्लब येथे काही नेत्यांचे प्रवेश पार पडले. यावेळी शिरपूरचे काँग्रेस आमदार काशीराम पावरा आणि गोपीचंद पडळकर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी शिरपूर काँग्रेसच्या अध्यक्षांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला.

- Advertisement -

याशिवाय काँग्रेसचे नेते अमरिश पटेल हे देखील येत्या काही दिवसांमध्ये भाजपमध्ये दाखल होतील, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. ‘गोपीचंद पडळकर पुन्हा घरात परत आले आहेत. त्यांनी धनगर समाजासाठी एक व्रत स्वीकारले आणि समाजाचे प्रश्न घेऊन महाराष्ट्रभर काम केले.

आदिवासी समाजाला लागू होणार्‍या २२ योजना धनगर समाजासाठी लागू करण्याचा निर्णय पडळकरांशी चर्चेनंतर आम्ही घेतला. त्यासाठी १ हजार कोटींचा निधी देखील दिला. त्या योजनांचा आता धनगर समाजाला फायदा होऊ लागला आहे’, अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी दिली.

- Advertisement -

‘पडळकरांनी वंचितच्या माध्यमातून लोकसभेत उभे राहण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मला दु:ख झाले. पण समाजाच्या भावना लक्षात घेत त्यांनी तो निर्णय घेतला होता. भविष्यात आमच्यासोबत राहिलात, तर अधिक चांगले निर्णय घेऊ शकाल, असे मी त्यांना नंतर पटवून दिले. त्यामुळे शेवटी त्यांनी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला’, असे देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

बारामतीच्या कोंडीचे डावपेच
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाची यावेळीही राजकीय कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी लोकसभा निवडणुकीवेळी ते दिसून आले होते. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी भाजपने जंगजंग पछाडले होते. स्वतः चंद्रकांत पाटील लोकसभा निवडणुकीदरम्यान बारामतीत मुक्काम ठोकून होते. मात्र भाजपचा हा डाव यशस्वी झाला नाही. यावेळी पुन्हा एकदा बारामतीत पवारांना पराभूत करून महाराष्ट्रात एक वेगळा संदेश देण्यासाठी भाजपने पडळकरांना उभे करण्याचे डावपेच रचले आहेत. यामागे अजित पवारांना त्यांच्यासारखा आक्रमक नेता बारामतीत अडकून पडेल, अशीही यामागे व्यूहरचना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मागच्या सर्व दौर्‍यात शरद पवार आणि त्यांचे कुटुबिय टार्गेट राहिले आहे. पवारांना लक्ष्य केले की विरोधकांच्या आव्हानातील हवा निघून जाईल म्हणून भाजपकडून हे ठरवून केले जात आहे. आताही विधानसभा निवडणुकीच्या निमिताने दिल्लीहून भाजपची फौज महाराष्ट्रात उतरेल ती पवारांना घायाळ करण्यासाठी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -