सांस्कृतिक डोंबिवलीत वाढणार वाचन संस्कृती; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचा श्रीगणेशा

Pai Friends Library Book Sharing Program in Dombivli inaugurated by dcm devendra fadanvis

जागतिक स्तरावर उंची गाठलेल्या डोंबिवलीतील पै फ्रेंड्स लायब्ररीच्या माध्यमातून होत असलेल्या पुस्तक आदान प्रदान कार्यक्रमाच्या चौथ्या वर्षीच्या सोहळ्याला यंदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा श्रीगणेशा स्वतः कडील बहुभाषिक पुस्तकांचे आदान प्रदान करून केला.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः केलेल्या या पुढाकारामुळे राज्यातील बहुतांशी ग्रंथालय, वाचनालय आदींसह पुस्तक प्रेमींना या उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळाली असल्याचा विश्वास आदान प्रदान सोहळ्याचे मुख्य आयोजक पुंडलिक पै यांनी केला. डोंबिवलीत २० ते २९ जानेवारी या कालावधीत येथील सावळाराम क्रीडा संकुलात होणाऱ्या पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे निमंत्रण सार्वजनिक बांधकाम मंत्री व डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पै यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या वृंदा भुस्कुटे, दीपाली काळे आदींसह मान्यवरांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिले.

वाचनप्रिय फडणवीस यांनी तात्काळ त्या उपक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. हा उपक्रम म्हणजे वाचकांसाठी ही पर्वणी असून डोंबिवलीत त्याचे सातत्याने आयोजन केले जात आहे ही कौतुकाची बाब आहे. तसेच या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचेही आश्वासन फडणवीस यांनी दिले. यावेळी फडणवीस यांनी स्वतः कडील दहा पुस्तकांचा संच तातडीने आदान म्हणून पै समूहाला दिला आणि त्याबदल्यात पै यांनीही त्यांना प्रदान स्वरूपात पुस्तके परत दिली, त्यामुळे त्या आमंत्रणाची भेट अविस्मरणीय झाल्याची प्रतिक्रिया वृन्दा भुस्कुटे यांनी दिली.

पुस्तक आदान प्रदान सोहळा हा आता पै यांचा राहिला नसून तो डोंबिवलीकर नागरिकांचा वाचकोत्सव झाला आहे, हजारो नागरिक आबालवृद्ध दरवर्षी या सोहळ्यात सहभागी होत असतात, परंतु यंदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत असल्याने वाचकांचा आनंद निश्चितच वाढला असून शहराच्या सांस्कृतिक जडण घडणीत मानाचा तुरा असल्याची प्रतिक्रिया मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.


राज्यपाल म्हणायचे, अभी बस, अभी मुझे जाना है”, अजित पवारांनी सांगितला किस्सा