घरमहाराष्ट्रपंढरपूरमध्ये घरातली जमीन खचून ३५ फुटांचा खड्डा, साड्यांच्या मदतीने वाचवला जीव

पंढरपूरमध्ये घरातली जमीन खचून ३५ फुटांचा खड्डा, साड्यांच्या मदतीने वाचवला जीव

Subscribe

आतापर्यंत तुम्ही रस्ता, डोंगर, पूल खचल्याच्या बातम्या वाचल्या असतील. पण राहत्या घरातलीच जमीन खचल्याची बातमी वाचून सुरूवातीला तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

आतापर्यंत तुम्ही रस्ता, डोंगर, पूल खचल्याच्या बातम्या वाचल्या असतील. पण राहत्या घरातलीच जमीन खचल्याची बातमी वाचून सुरूवातीला तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. होय. पण हे खरंय. ही आश्चर्यकारक घटना पंढरपुरात घडलीय. धक्कादायक म्हणजे घरातली ही फक्त जमीनच खचली नाही तर त्या ठिकाणी तब्बल ३५ फुटांचा खड्डा पडला. घरात राहणाऱ्या तीन महिला या खड्ड्यात पडल्या. त्यानंतर साड्यांच्या मदतीने त्यांचा जीव वाचवण्यात आला आहे.

पंढरपूरमधल्या कोळी गल्ली परिसरात ही घटना घडली. या परिसरात राहणाऱ्या राहुल शिंदे यांच्या घरातली जमीन खचली. या घटनेत जवळपास ३० ते ३५ फूटांचा खोल खड्डा पडला. अचानकपणे आज दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. राहुल यांच्या कुटुंबातील एक महिला या खड्ड्यात पडल्यानंतर ती ओरडू लागली. तिच्या या ओरडण्याने शेजारील एक महिला काय झालं आहे हे पाहण्यासाठी आली आणि तिलाही या खड्ड्याचा अंदाज न आल्याने तीदेखील खाली पडली. यानंतर राहुल शिंदे यांची 89 वर्षाची आई देखील या खड्ड्यात पडल्याने सारेच जण घाबरून गेले होते.

- Advertisement -

घरात पडलेल्या या खड्ड्यात पाणी होतं. दगड माती पडत असल्याने बाकीचे घाबरून गेले. या घटनेची माहिती प्रशासनाला दिली असतानाही वेळेत मदतीसाठी प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचू शकले नाहीत. शेवट वाट पाहून तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी घरात असलेल्या साड्यांना गाठी बांधून या महिलांचे प्राण वाचवले. नंतर या महिलांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

वारंवार येणाऱ्या पुरामुळे या ठिकाणची जमीन गाळाची बनल्याने असे पेव पडत असल्याचं नागरिकांनी सांगितलं. सुदैवाने ही घटना दिवसा घडल्याने त्यांना तात्काळ मदत मिळाली. आता अशा धोकादायक बनलेल्या इमारतींची तपासणी प्रशासनाने हाती घेणे गरजेचे आहे. कारण पंढरपुरातील अशा अनेक घरांमध्ये वारकरी वास्तव्याला उतरतात, त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -