Pandharpur Assembly By election 2021 Result: पोटनिवडणुकीतून सरकार विरोधात संताप व्यक्त – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

राज्यातील जनता महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराला वैतागली असून या सरकारबद्दलचा संताप पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत व्यक्त झाल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिली. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे विजयी झाले. या विजयावर बोलताना पाटील यांनी ही पोटनिवडणूक म्हणजे एक लिटमस टेस्ट होती, असे सूचक विधानही केले.

लोकांच्या मनात आघाडी सरकारबद्दल राग आहे. संधी मिळेल तेथे लोक तो व्यक्त करतात. ग्रामपंचायत निवडणुकीतही साडेचौदा हजार पैकी सहा हजार ग्रामपंचायतीत भाजपला विजय मिळाला. महाविकास आघाडी सरकारवरील लोकांचा विश्वास उडाला आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार चालवू शकत नाहीत, हे या पोटनिवडणुकीतील जनतेच्या कौलावरून दिसून आल्याचे पाटील म्हणाले.

महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीला वैतागली आहे. विजेची कनेक्शन कापणे, वेगवेगळी नुकसानभरपाई खात्यात जमा नाही, शेतकऱ्यांना मदत नाही, पीकविम्याचा लाभ नाही, कोरोना काळात हातावर पोट असणाऱ्यांना पॅकेज नाही. जे तुटपुंजे पॅकेज दिले त्याची अंमलबजावणी नाही, अशा अनेक प्रश्नांनी लोक हैराण झाले आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.


हेही वाचा – जागरूक राहून समन्वयाने काम करा, मुख्यमंत्र्यांची कोकण विभागातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना