अतिशय प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या अशा पंढरपूर पोट निवडणुकीच्या मतदानाला आज शनिवारी सकाळीच सुरूवात झाली. सकाळच्या पहिल्या टप्प्यात ९ वाजेपर्यंत ६.५ टक्के इतकेच मतदान झाले आहे. कोरोनाच्या संकट काळात महाविकास आघाडीने आणि भाजपनेही ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे खरी. पण मतदानाला तितकासा प्रतिसाद मिळत नाही, असेच चित्र सध्या आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४२ टक्के इतकेच मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणुक पार पडत आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके तर भाजपकडून समाधान आवताडे यांना या निवडणूकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. पण सकाळच्या सत्रात मात्र मतदानासाठी तितकेसे लोक रस्त्यावर उतरले नाहीत, अशीच परिस्थिती आहे. त्यानंतरच्या टप्प्यात म्हणजे ११ वाजेपर्यंत १९.३३ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी आहे. (Pandharpur by election 2021 voting updates, 19.33 percent voting till 11 am morning)
पंढरपूर विधानसभेअंतर्गत एकुण १ लाख ७८ हजार १९० पुरूष मतदार आहेत. तर स्त्रियांची संख्या १ लाख ६२ हजार ६९४ इतकी आहे. इतर मतदारांचा आकडा ५ इतका आहे. एकुण ३ लाख ४० हजार ८८९ मतदार या पंढरपूर विधानसभा मतदारसंघात आहे. त्यामध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत १९.३३ टक्के मतदारांनी मतदानाच्या प्रक्रियेत सहभाग घेतला. सकाळी ११ वाजेपर्यंत ६५ हजार ८९१ मतदारांनी मतदान केला आहे. त्यामध्ये पुरूष मतदारांची संख्या ३८ हजार ५८७ इतकी आहे. तर स्त्री मतदारांची संख्या २७ हजार ३०४ इतकी होती.
राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतरची ही पहिलीच पोटनिवडणूक आहे. या पोटनिवडणुकीत १९ उमेदवार आपले नशीब आजमावत असले तरी मुख्य लढत ही राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके आणि भाजपचे समाधान अवताडे यांच्यात आहे. ही पोटनिवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली असून या निमित्ताने महाविकासआघाडीला धक्का देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर पंढरपूरची जागा राखण्यासाठी राष्ट्रवादीने शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची बनली आहे. पंढरपूर मतदारसंघातील ३ लाख ४० हजार ८८९ मतदार आज उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद करतील. दरम्यान,कोरोनाचे संकट लक्षात घेऊन आज पंढरपूर मतदारसंघातील ५२४ मतदान केंद्रांवर सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेत मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीची मतमोजणी २ मे रोजी होणार आहे.