त्यांच्या मनामध्ये स्वार्थ; पंकजा मुंडेंचा फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा

संग्रहित छायाचित्र

 

मुंबईः मठातल्या एखाद्या माणसाला जवळ केले की लोकं जवळ येतात, असा अविर्भाव आणू नका. कारण लोकं अशा स्वार्थी वृत्तीच्या जवळ येत नाहीत, असा टोला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी हाणला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा टोला हाणल्याची चर्चा सुरु आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच गहिनीनाथ गडावर गेले होते. तेथील कार्यक्रमाला पंकज मुंडे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार होते. पण ते गेले नाहीत. मात्र पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, मठातला माणूस जवळ केला की लोकं जवळ येत नाही. लोकांना स्वार्थी वृत्ती कळते.

बीड जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी बूथ सशक्तीकरण, जिल्हा प्रशिक्षण वर्ग व जिल्हा कार्यकारिणी बैठक पंकजा मुंडे यांनी घेतली. त्यात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. तसेच पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तुमच्या आणि माझ्या संघर्षाला सोन्याचे दिवस येतील. हात आपटून आपण आपला हक्क घेऊ. त्यामुळे कामाला लागा, असा सल्ला पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

भाषणात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनाही सुनावले. गोपीनाथ मुंडे साहेबांची कॉपी करून कोणी मुंडे साहेब होत नाही. त्यांच्या विचारांचे अनुकरण केलंत तर मुंडे साहेब होता येईल अन्यथा नाही, असे पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव घेता सांगितले.

पंकजा मुंडे यांनी शिंदे-फडणवीस सरकारलाही घरचा आहेर दिला. सध्या फक्त ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका होत नाहीत. गावागावात युद्ध सुरु झाल्याची स्थिती आहे, असा निशाणा पंकजा मुंडे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर साधला.

दरम्यान, कसबा पेठ पराभवावरही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली होती. योगायोगाने आम्ही सत्तेत होतो. बलाढ्य नेते आमच्या पक्षात होते. त्यामुळे ते बलाढ्य नेते सगळे तिथे दिसले. पण बाकीच्या पक्षांचे सर्व महत्वाचे नेते तिथे आले आणि त्यांनी प्रयत्न केले. आता आमची हार झाली ही स्वीकारली पाहिजे आणि का झाली? याचा विचार केला पाहिजे, त्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर काय होतो? याचंही आम्ही अंतर्मुख होऊन किंवा वरिष्ठांनी विचार करुन भविष्यामधले निर्णय घेतले पाहिजेत, असा सल्ला त्यांनी भाजपला दिला होता.