पंकजाताईंना उमेदवारी डावलल्यानं माझ्या मनाला वेदना, एकनाथ खडसे भावूक

पंकजाताई यांच्याही पेक्षा महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाच्या विस्तारामध्ये उभं आयुष्य आणि हयात घालवली. एक प्रकारे त्या ठिकाणी दोघांनीही बलिदान केले. पक्ष विस्तार आणि बहुजन समाजाचा चेहरा निर्माण करण्यात त्यांचं फार मोठं योगदान आहे, असंही एकनाथ खडसेंनी सांगितलंय.

मुंबईः विधान परिषदेच्या उमेदवारीकडे डोळा लावून असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा डावलले. भाजपने पंकजा मुंडे यांना डावलत राम शिंदेंसारख्या ओबीसी नेत्याला संधी दिली. त्यामुळे पंकजा समर्थकांत तीव्र नाराजी आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनीही नाराजी व्यक्त केलीय. या ठिकाणी तो निर्णय जरी बीजेपीचा असला तरी पंकजा ताईंचे मुंडे कुटुंबीयांचे आणि आमचे फार अत्यंत जवळचे संबंध आहेत. या निर्णयामुळे माझ्या मनाला वेदना झाल्यात, असं एकनाथ खडसे म्हणालेत.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते. पंकजाताई यांच्याही पेक्षा महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाच्या विस्तारामध्ये उभं आयुष्य आणि हयात घालवली. एक प्रकारे त्या ठिकाणी दोघांनीही बलिदान केले. पक्ष विस्तार आणि बहुजन समाजाचा चेहरा निर्माण करण्यात त्यांचं फार मोठं योगदान आहे, असंही एकनाथ खडसेंनी सांगितलंय.

आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पक्षामध्ये आणणं, त्यांना संधी देणं हे त्यांनी केलेलं आहे. अशा स्थितीत पंकजा ताई या कर्तृत्ववान महिला आहेत. राजकारणात त्यांची पूर्ण महाराष्ट्रात ओळख आणि अस्तित्व आहे. अशा ठिकाणी पंकजा ताईंची उमेदवारी नाकारली हे अत्यंत दुर्दैवी आहे. मला अत्यंत खेद झाला. या ठिकाणी जो निर्णय जरी बीजेपीचा असला तरी पंकजा ताईंचे मुंडे कुटुंबीयांचे आमचे फार अत्यंत जवळचे संबंध आहेत. या निर्णयामुळे माझ्या मनाला वेदना झाल्याचंही एकनाथ खडसेंनी अधोरेखित केले.

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 20 जूनला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत गुरुवारी संपत असताना भाजपने बुधवारी दिल्लीतून महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच उमेदवारांची घोषणा केली. भाजपच्या उमेदवार यादीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची छाप असल्याचं पाहायला मिळालं. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पसंतीचे उमेदवार देताना पंकजा मुंडे यांना शह दिल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

विशेष म्हणजे विधान परिषदेची उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे सांगत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षरीत्या उमेदवारीची मागणी केली होती, मात्र त्यांच्या मागणीची पक्षाने दखल घेतली नाही. त्यांच्याऐवजी ओबीसी समाजातील राम शिंदे आणि भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांना संधी देण्यात आली. खापरे या भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात.


हेही वाचाः पंकजा मुंडेंचा पत्ता कट ; प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड यांना उमेदवारी