माझी पात्रता वाटत नसेल म्हणून मंत्रिपद दिलं नसेल, पंकजा मुंडेंचा भाजपाला खोचक टोला

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा आहेत. गेल्या तीन वर्षांपासून त्यांना डावललं जात असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येतोय. दरम्यान, आज पंकजा मुंडे यांनी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना खोचक टोला लगावला आहे. वरिष्ठ नेत्यांना माझी पात्रता वाटत नसेल म्हणून मला मंत्रिपद दिलं नसेल असा टोला त्यांनी लगावला आहे. आज त्यांनी महादेव जानकर यांना राखी बांधली. रक्षाबंधन झाल्यानंतर त्यांनी जानकरांशी बातचीत केली. त्यावेळी मुंडेंनी जानकरांकडे नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या अनेकदा दिल्ली वाऱ्या मात्र जनतेसाठी मदतीची मागणी नाही, जयंत पाटलांची टीका

पंकजा मुंडे महादेव जानकरांना म्हणाल्या की, “ज्यावेळेस मंत्रिमंडळ बनत असते तेव्हा सर्वांना समाधानी करणं शक्य नसतं. त्यामुळे जे मंत्री झाले त्यांनी तरी लोकांचं समाधन करावं अशा शुभेच्छा मी नव्या मंत्र्यांना दिल्या आहेत. सतत चर्चेत असलेलं माझं नाव आहे. पण अजूनही माझी पात्रता वाटत नसेल त्यामुळे मला मंत्रिपद दिलं नसेल. जेव्हा त्यांना माझी पात्रता वाटेल तेव्हा ते मंत्रिपद देतील. त्याबद्दल मला आक्षेप नाही.”


महिलांना मंत्रिमंडळात संधी मिळालीच पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. महिला आहे म्हणून तिला बालकल्याण खातं, मस्लिम आमदाराला अल्पसंख्याक खातं, आदिवासी समाजातील आमदाराला शुड्युल कास्ट अशी मंत्रिपदं देऊ नयेत. मी महिला असूनही मला मागच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास खातं देण्यात आलं होतं. त्यामुळे महिला समान संधी द्याल अशी मी अपेक्षा करते, असंही मुंडे म्हणाल्या.