घरताज्या घडामोडीपंकजा मुंडे म्हणाल्या, 'मी पक्ष सोडणार नाही, पण...'!

पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘मी पक्ष सोडणार नाही, पण…’!

Subscribe

पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये केलेल्या भाषणातून भाजपला अनेक वक्तव्यांमधून सूचक इशारे दिले आहेत. पंकजा मुंडे भाजप सोडून स्वतंत्र चूल मांडणार असल्याच्या चर्चांना त्यांची भाषणातली ही वक्तव्य बळ देणारी ठरली आहेत.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये त्यांच्या कन्या, राज्याच्या माजी महिला व बालकल्याण मंत्री आणि ‘अजूनही’ भाजपच्या सदस्य असलेल्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या भाषणात राज्यातील भाजप नेतृत्वासोबतच अनेकांना टोले लगावले. अत्यंत आवेशपूर्ण अशा या भाषणामध्ये पंकजा मुंडे यांनी बंडखोरी करणार असल्याच्या चर्चा फक्त वावड्या असल्याचं सांगितलं. मात्र, त्यासोबतच पंकजा मुंडे असं काही म्हणाल्या, की त्यामुळे त्या नक्की भाजपसोबतच राहणार की नवा पक्ष स्थापन करणार? याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. आपण पक्षासोबत राहणार असं म्हणतानाच पंकजा मुंडेंनी केलेल्या ‘या’ वक्तव्यांमुळे त्या वेगळा विचार करण्याच्या मनस्थितीत आहेत असा अर्थ काढण्यास त्यांनी पुरेशी जागा करून दिली आहे.

‘वेगळा पक्ष वगैरे बघू काय करायचं ते’

यावेळी बोलताना पंकजा मुंडेंनी सध्या सुरू असलेल्या चर्चांचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, ‘गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या की पंकजा मुंडे बंडखोरी करणार, पंकजा मुंडे पक्ष सोडणार. पण मी पक्ष सोडणार नाही. जोपर्यंत लोकशाही पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत, मी पक्ष सोडणार नाही. खंजीर खुपसणं माझ्या रक्तात नाही’. पण असं बोलतानाच काही वेळातच त्या म्हणाल्या, ‘सगळे म्हणतायत, पक्ष काढणार-पक्ष काढायचा का काय करायचं ते बघू की, करू काहीतरी’. यातून पंकजा मुंडेंनी स्वतंत्र पक्ष काढण्याची देखील तयारी असल्याचंच सूचित केल्याचं म्हटलं जात आहे.

- Advertisement -

‘आता मी स्वतंत्र आहे’

दरम्यान, यावेळी बोलताना पंकजा मुंडेंनी भाजपच्या कोअर कमिटीमधून देखील बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं. ‘मी कोणतीही आमदार-खासदार नाही, पक्षाचं कोणतं पद माझ्याकडे नाही आणि आजपासून मी पक्षाच्या कोअर कमिटीमध्ये देखील नाही. आता मी स्वतंत्र आहे. मी पक्ष सोडलेला नाही. पक्षाला जर मला सोडायचं असेल, तर त्यांनी तसा विचार करावा’, असं त्या म्हणाल्या.


हेही वाचा – ‘मी आता बहुजनांची’ म्हणत पकंजा मुंडे सुरु करतायत नवी इनिंग!

फक्त नाराज नेत्यांची घेतली नावं!

भाषणादरम्यान, पंकजा मुंडेंनी स्टेजवरच्या आणि आधी भाषण केलेल्या नेत्यांची नावं घेतली. त्यामध्ये एकनाथ खडसे, प्रकाश मेहता या दोघा नेत्यांची नावं आवर्जून घेतली. गेल्या काही दिवसांमध्ये या नेत्यांमध्ये झालेल्या बैठका आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांकडे दिलेल्या प्रतिक्रियांवरून स्वतंत्र सवतासुभा मांडला जाण्याची जोरदार चर्चा रंगली होती. तसेच, आज पंकजा मुंडे यांचं भाषण झाल्यानंतर या दोघांनीही, ‘सर्व निर्णयांमध्ये आणि वाटचालीमध्ये आम्ही पंकजा मुंडेंसोबत आहोत’, असं ठाम प्रतिपादन देखील केलं.

एक प्रतिक्रिया

  1. खरंच, सोडू द्या भाजपा त्यांना. आपली खरी किंमत नंतर कळेल. गोपीनाथ मुंडे वेगळे नी त्यांच्या आपोआप मिळालेल्या गादीवर बसायला मिळाल्याने स्वत:ला मोठे समजणारे वेगळे. ते नंतर ठरेल. मोहन देवळे.

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -