नाशिक : शिवशक्ती परिक्रमा (Shivshakti Parikrama) यात्रेनिमित्ताने सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे आलेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी एकलव्यनगर ठाकर आदिवासी पाड्यास भेट दिली. येथे स्वागत झाल्यानंतर त्यांनी एका घरात जाऊन भाकरी थापत चुलीवरील भोजनाचाही आस्वाद घेतला. देवराम आगिवले या आदिवासी कुटुंबाकडे जेवणासाठी गेल्या होत्या. यावेळी मुंडे यांनी चुलीजवळ बसून बाजरीच्या भाकरी थापल्या.
भाजपा नेत्या पंकजा मुंडे सोमवार (दि. ४) पासून शिवशक्ती परिक्रमा निमित्ताने राज्यभरातील देवस्थानांच्या दर्शनासाठी निघाल्या आहेत. तिसरा श्रावणी सोमवार ते चौथा श्रावणी सोमवार असे ८ दिवस पांकजा मुंडे यांचा हा महाराष्ट्र व्यापी दौरा आहे. या परिक्रमा यात्रेची सुरवात छ. संभाजी नगर येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन झाली. त्यानंतर त्या नाशिक जिल्ह्यात दाखल झाल्या. पहिल्या दिवशी आदिशक्ती सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. ५) त्यांनी त्र्यंबकेश्वर महादेवाचा अभिषेक करत दर्शन घेतले. नाशिक जिल्ह्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावातील एकलव्य नगर या ठाकर आदिवासी समाजाच्या पाड्याला भेट दिली याठिकाणी त्यांनी स्वतः भाकरी थापल्या तसेच आदिवासी बांधवांसोबत जेवणाचाही आस्वाद घेतला.
पंकजा मुंडे या देवराम आगिवले यांच्या आदिवासी कुटुंबाकडे जेवणासाठी गेल्या होत्या. यावेळी मुंडे यांनी चुलीजवळ बसून बाजरीच्या भाकरी थापल्या. मुंडे यांच्यासाठी स्वयंपाक बनवणाऱ्या मथुराबाई आगिवले, जयश्री आगिवले, सुलाबाई पथवे, गीता आगिवले यांनी ठाकर समाजातील शेंगदाण्याची चपाती मुंडे यांना बनवून दाखवली. यावेळी घरातील महिलांशी गुजगोष्टी केल्या. त्यांनी थेट चुलीसमोरच बैठक मारत हाताने पीठ मळून त्यांनी काही वेळेतच भाकरी थापली. चुलीवर तापलेल्या तव्यावर त्यांनी भाकरी टाकत पाण्याचा शिपकाही मारला. त्यांनंतर भाकरी पिठले, कुळथाचे शेंगोळे, मटकी, ठेचा, झिरके, शेंगदाण्याची पोळी अशा भोजनाचा आस्वाद घेतला.
जिल्हाभरात ठीकठिकाणी जोरदार स्वागत
पंकजा मुंडे सोमवारी (दि. ४) नाशिक जिल्ह्यात पोहचल्या. येवला मार्गे त्यांचा जिल्ह्यात प्रवेश झाला. तिथपासूनच टप्प्या टप्प्यावर नाशिककरांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. सप्तशृंगी देवीचे दर्शन घ्यायला देखील त्या तब्बल ४ तास उशिराने पोहचल्या. त्यानंतर जेव्हा नाशिक शहरात जेव्हा दाखल झाल्या तेव्हा रात्री ११.३० वाजता देखील हजारो कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. त्यांच्या दौऱ्यात पहिल्या दिवशी एकूण ५ ठिकाणी स्वागत होणे अपेक्षित असताना तब्बल ४६ ठिकाणी स्वागत झाल्याने नियोजित दौरा ४ तास उशिराने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, पुढील दौऱ्यात कृपया नियोजित ठिकाणीच सर्वांनी जमावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.