आष्टी (बीड) – भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ सिंचन प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आलेल्या पंकजा मुंडे यांनी उपस्थितांची नावे घेत असताना बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार संदीप क्षीरसागर यांचा उल्लेख केल्यानंतर जोरदार टाळ्या आणि शिट्या वाजल्या. उपस्थित प्रक्षेकांमधून विरोधी पक्षाच्या खासदार आणि आमदारांच्या नामोल्लेखाला मिळालेला प्रतिसाद पाहून पंकजा मुंडेंनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना त्याकडे लक्ष देण्याचे आवाहन करत म्हटले, हे पाहताय ना देवेंद्रजी.
बीडमधील आष्टी उपसा सिंचन योजना क्र. 3 अंतर्गत येणार्या शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी आज करण्यात आली. तसेच यातील बोगदा कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक आष्टीचे आमदार सुरेश धस, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके, आमदार नमिता मुंदडा, आमदार विजयसिंह पंडित, माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यासह अनेक आजी-माजी आमदार उपस्थित होते.
पंकजा मुंडे यांनी उपस्थितांचा उल्लेख करताना बीडचे खासदार बंजरंग सोनवणेंचा विशेष उल्लेख केला. त्या म्हणाल्या माझ्याविरोधात लढलेले आणि आता बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, आष्टीचे आमचे सुरेश अण्णा धस. बघा मी सुरेश अण्णा म्हणत आहे, ते पंकजा ताई नाही म्हणाले पण मी सुरेश अण्णा धस म्हणतेय. माझ्याकडून आदरात कोणतीच कमी राहिलेली नाही. मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे. दिलेल्या शब्दाला जागणारी आहे.
सुरेश धसांनी विधानसभेत विजयी झाल्यानंतर पहिल्याच सभेत पंकजा मुंडेंवर हल्लाबोल केला होता. पंकजा मुंडेंनी भीमराव धोंडेंना निवडणुकीत मदत केल्याचा आरोप त्यांनी केला होता. पंकजा मुंडे यांना लोकसभेत आष्टी-पाटोदा मतदारसंघातून लीड देऊनही विधानसभेत त्यांनी आमच्याविरोधात काम केले असा आरोप निवडणूक निकालापासून आमदार धस करत आहेत. आज प्रथमच भाजपचे जिल्ह्यातील दोन्ही नेते एका मंचावर आले होते.
शिवगामी आणि बाहुबली
सुरेश धसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बाहुबली म्हटले. तोच धागा पकडत पंकजा मुंडे म्हणाल्या, देवेंद्र जी तुम्ही मंत्रिमंडळात आमचे ज्येष्ठ आहात, मंत्रिमंडळाचे प्रमुख आहात. आज तुम्हाला जे लोक बाहुबली म्हणत आहेत मला ते शिवगामी म्हणायचे…
शिवगामी ही बाहुबलीची आई होती, त्यामुळे मला तुमच्याबद्दल आज ममत्व वाटत आहे. शिवगामीचा डायलॉग आहे, ‘मेरा वचन ही है मेरा शासन है’ ही गोपीनाथ मुंडेंची लेक आहे, जो शब्द देते तो पूर्ण करते. असे म्हणत पंकजा मुंडेंनी सुरेश धसांच्या आरोपांना सपशेल फेटाळले.
40 गावांत सैनिकी छावणी होणार होती…
“सुरेश धसांनी आवर्जून उल्लेख केला 2003चा. पंकजा मुंडे म्हणाल्या, देवेंद्र जी आपण ज्यांना लहानपणापासून पाहत आलात त्या प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सांगते, अण्णा (सुरेश धस) मी तुम्हाला अण्णा म्हणते बरं का? तुम्ही ताईसाहेब म्हणत नाही. हे आपलं प्रेमाचं नातं, जसंच्या तसं आहे. इज्जत आम्हीही देतो, असं म्हणत सुरेश धसांना टोला लगाला. पंकजा मुंडे म्हणाल्या, पण मला आनंद वाटला. तुम्ही 2003 चा उल्लेख केला. मुख्यमंत्री महोदय मी तुम्हाला आठवण करून देते. या ठिकाणी सैनिकी छावणी करण्याचा प्रस्ताव तत्कालिन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस असताना झाला. त्यावेळी प्रमोद महाजन यांना गोपीनाथ मुंडे यांनी जानेवारीत 2003 मध्ये पत्र लिहिलं, आणि 19 फेब्रुवारी 2003 रोजी जॉर्ज फर्नांडिस यांना पत्र दिलं. ही 40 गावं माझी आहेत. इथं सैनिकी छावण्या करू नका. इथे शेती आहे. बागायती आहे. उपसा जलसिंचन योजना करा, असं त्या पत्रात म्हटलं होतं. सुरेश धस यांनी त्याचा आवर्जुन उल्लेख केला, अशी आठवणही पंकजा मुंडेंनी करुन दिली.
बीड हा गडांचा जिल्हा, पण लोक व्यक्तीला पूजत नाही..
बीड जिल्ह्यात विविध समाजाचे धार्मिक स्थळ असलेले गड आहेत. धनंजय मुंडे नुकतेच भगवानगडावर मुक्कामी होते. या गडावर राजकीय कार्यक्रम करण्यासाठी पंकजांना गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी परवानगी नाकरली होती. मात्र परवा त्याच नामदेव शास्त्रींनी धनंजय यांच्यासोबत राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक चर्चा झाल्याचे सांगत त्यांची पार्श्वभूमी राजकीय परिवाराची आहे. त्यांना गुन्हेगार का ठरवलं जात आहे, असे म्हणत गड मुंडेंच्या पाठीमागे भक्कम नाही तर 100 टक्के उभा असल्याचं म्हटलं होतं. त्याचा कुठेही उल्लेख न करता पंकजा मुंडे म्हणाल्या, हा गडांचा जिल्हा आहे. गडांवरुन राजकारण होतं, असं बाहेर दाखवलं जात असलं तरी गडांवरुन राजकारण होत नाही. गडांच्या गादीवर लोक नतमस्तक होतात. पण या जिल्ह्यात कधीच कोणी व्यक्तीला पूजत नाही. जिल्ह्यातील प्रत्येक माणूस विकासाच्या मागे भक्कमपणे उभा राहिलेला आहे.
देवेंद्र जी आम्हाला माहित होतं तुमच्या हातात नेतृत्व येणार आहे…
पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच बीड जिल्ह्यात आलेल्या देवेंद्र फडणवीसांना त्यांच्यासाठी किती काम केले याचीही आठवण करुन दिली. त्या म्हणाल्या की, ज्यांच्या पाठीमागे खासदार, आमदार नाही तेही नेते येथे मोठे होतात. देवेंद्र जी तुम्हाल पंतप्रधानांचे आशीर्वाद आहेत. शेवटी सगळे काम करतात, तुम्ही मुख्यमंत्री व्हावं म्हणून आम्ही रात्रंदिवस प्रचार केला. घसा कोरडा पडेपर्यंत सभा घेतल्या. आम्हाला माहित होतं की तुमच्या हातात नेतृत्व येणार आहे. नरेंद्र मोदींनी तुमच्या डोक्यावर हात ठेवला आहे. तुम्हीही तुमच्या अनुयायांच्या डोक्यावर हात ठेवावा आणि विकासाची कामं करावित, असं पकंजा मुंडे म्हणाल्या.
हेही वाचा : CM Fadnavis on Beed Crime : असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही – मुख्यमंत्री फडणवीस