घरCORONA UPDATEपंकजा मुंडे यांच्या कट्टर समर्थकाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

पंकजा मुंडे यांच्या कट्टर समर्थकाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

Subscribe

भाजपने ऐनवेळी विधानपरिषदेचा उमेदवार बदलला असून, डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगत पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक रमेश कराड यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे.

विधान परिषदेची उमेदवारी न दिल्याने नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांना भाजपने दिलासा दिला आहे. भाजपने ऐनवेळी विधानपरिषदेचा उमेदवार बदलला असून, डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगत पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक रमेश कराड यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान गोपछडे यांनी ८ मे रोजी आपला अर्ज भरला होता, तर काल शेवटच्या दिवशी रमेश कराड यांनी आपली उमेदवारी दाखल केली होती. विशेष म्हणजे भाजपने ८ तारखेला अजित गोपछडे यांच्यासह माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके यांचे उमेदवारी अर्ज भरले होते. त्याशिवाय डमी अर्ज म्हणून रमेश कराड आणि संदीप लेले यांना अर्ज भरण्यास सांगितले. मात्र आता डमी उमेदवार असलेले रमेश कराड हे मुख्य उमेदवार म्हणून भाजपने निवडले आहेत.

कोण आहेत रमेश कराड

रमेश कराड हे पंकजा मुंडे यांचे समर्थक आहेत. २०१८ मध्ये बीड-उस्मानाबाद-लातूर या मतदारसंघातून निवडायच्या विधानपरिषद जागेसाठी झालेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीकडून अर्ज भरला होता. मात्र ऐनवेळी माघार घेऊन त्यांनी भाजपच्या सुरेश धस यांना पाठिंबा दिला होता. दरम्यान गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळीही रमेश कराड यांची निराशा झाली होती. शिवसेना-भाजप युतीमध्ये लातूर ग्रामीण मतदारसंघ शिवसेनेला सुटला होता. त्यामुळे रमेश कराड यांचे समर्थक आणि भाजप कार्यकर्ते संतप्त झाले होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे २०१८ मध्ये त्यांना राष्ट्रवादीने विधानपरिषदेचं तिकीट दिले होते. मात्र अवघ्या पाच दिवसात त्यांनी माघार घेत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

- Advertisement -

२१ मे रोजी विधानपरिषद निवडणूक

कोरोना व्हायरसमुळे रखडलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त ९ जागांसाठी अखेर निवडणूक जाहीर झाली. येत्या २१ मे रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी म्हणजे २१ तारखेलाच मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -