फडणवीसांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरून पंकजा मुंडेंचा फोटो गायब, राजकीय चर्चांना उधाण

मागील काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे या पक्षात नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. बीडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती न लावल्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, औरंगाबादमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानिमित्त स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर पंकजा मुंडे यांचा फोटो गायब असल्याचे दिसून येत आहे.

देवेंद्र फडणवीस औरंगाबाद दौऱ्यावर आले असता त्यांच्या स्वागतासाठी भाजप नेते आणि मंत्री अतुल सावे यांच्याकडून बॅनर लावण्यात आले आहे. पण, यामधून पंकजा मुंडेंचा फोटो वगळण्यात आला आहे. फडणवीस यांची विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक असताना कार्यालय परिसरात हे बॅनर लावले आहे. परंतु मुंडे यांचा फोटो नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

पंकजा मुंडेंचा भाजपकडून अपमान होत असल्याने ठाकरे गटाने त्यांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली होती, त्यावरील पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत पंकजा मुंडे म्हणाल्या की, आपल्या मनात कोणतीही खदखद नाही.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच यावर उत्तर दिलं आहे. तीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. माझ्या मनात कोणताही खदखद नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमाला आले, त्या कार्यक्रमांमध्ये मी उपस्थित राहणं अपेक्षित नव्हतं, म्हणून मी तिथे आले नाही. आज माझे प्रदेशाध्यक्ष आले होते. त्यामुळे मी आले. जे.पी.नड्डा जेव्हा आले तेव्हाही मी आले. मी भाजपाची सच्चा कार्यकर्ता आहे. पक्षाच्या बाहेरच्या कार्यक्रमांना जाणं मला बंधनकारक वाटत नाही, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह झालेल्या बैठकीला पंकजा मुंडे हजर होत्या. परंतु फडणवीसांच्या औरंगाबाद दौऱ्याच्या स्वागताच्या बॅनरवरून त्यांचा फोटो काढण्यात आल्यामुळे त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येणार?, हे पाहणं महत्त्वाचं आहे.


हेही वाचा  : देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमांना गैरहजेरी का? पंकजा मुंडेंनी सांगितलं कारण