नागालँडमध्येही ‘पन्नास खोके एकदम ओके’ झालंय का? सत्ताधाऱ्यांचा विरोधकांना उपरोधिक टोला

Maharashtra Assembly Budget 2023 | नागालँडमध्येही पन्नास खोके एकदम ओके झालंय का, असा खोचक सवाल पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांना विचारला. यावरून सभागृहात एकच गोंधळ झाला.

nagaland ekdam ok

Maharashtra Assembly Budget 2023 | नागालँडमध्ये एनडीपीपी आणि भाजप युतीने विधानसभेच्या ६० जागांपैकी ३७ जागा मिळवत सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. मंगळवारी या सरकारचा शपथविधी सोहळा झाला. नेफ्यू रिओंनी पाचव्यांदा नागालँडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. २ मार्च रोजी लागलेल्या निकालात एनडीपीपीला सर्वाधिक २५ आणि भाजपला दुसर्‍या क्रमांकाच्या १२ जागा मिळाल्या आहेत, तर या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील नेत्रदीपक यश मिळवले आहे. ७ आमदार निवडून आल्याने राष्ट्रवादी नागालँडमध्ये तिसर्‍या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या हाती विरोधी पक्षाची सूत्रे जाणार असे म्हटले जात असताना राष्ट्रवादीने अनपेक्षितरित्या सत्ताधार्‍यांना पाठिंबा दिल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. याचेच पडसाद आज विधानसभेत उमटले. नागालँडमध्येही पन्नास खोके एकदम ओके झालंय का, असा खोचक सवाल पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांना विचारला. यावरून सभागृहात एकच गोंधळ झाला.

हेही वाचा – शेतकरी प्रश्नांवरून सभागृहात खडाजंगी, मुख्यमंत्रीही संतापले; सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. बदलाचे वारे पाहा कसे वाहायला लागलेत. नागालँडमध्येही पन्नास खोके एकदम ओके झालंय का, अशा पद्धतीची शंका निर्माण झालं आहे. जातीयवादी सरकार म्हणून आरोप करायचे आणि दुसरीकडे मांडीला मांडी लावून बसायचं आणि बदलाचे वारे वाहायला लागले आहेत असं म्हणायचं. पन्नास खोके आणि नागालँड ओके असं झालंय का असा माझा सवाल आहे, असं गुलाबराव पाटील पाटील म्हणाले. लक्षवेधी तासादरम्यान अचानक स्कोपबाहेरील मुद्दा गुलाबराव पाटलांनी उपस्थित केल्याने अजित पवारांसह राष्ट्रवादीचे अनेक आमदारांनी संताप व्यक्त केला.


प्रत्येक गोष्टीत राजकारण आणलंच पाहिजे असं काही नाही. सर्व यंत्रणा, संस्था तुमच्या ताब्यात आहेत. केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार आहे. मग, चौकशी करा, ही कोणती पद्धत आणली? आरोप करायची. कारण नसताना आरोप का करता? ईशान्येची राज्य, तिथली राजकीय परिस्थिती वेगळी आहे. सर्व पक्ष येऊन सरकार स्थापन करतात अशी तिथली परंपरा आहे. भारतातील तो भाग भारतातच राहण्याकरता भारतीय म्हणून निर्णय घेतला, मग कारण नसताना येथे चर्चा करण्यात काय अर्थ आहे, असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विचारला. तसंच, राष्ट्रवादीने सरकारने पाठिंबा दिला नसून तेथली मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हे बेगामी शादी मे अब्दुल्ला दिवाना झाले आहेत, अशी टीका माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळ यांनी केली.

या सर्व गोंधळात मुख्यमंत्र्यांनीही विरोधकांवर निशाणा साधायची संधी सोडली नाही. “शरद पवार म्हणाले होते की बदलाचे वारे वाहत आहेत. हेच का बदलाचे वारे असा प्रश्न गुलाबराव पाटलांनी विचारला. आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला पण सरकारला नाही, असं भुजबळ म्हणाले. पण हे कोणतं तत्वज्ञान? आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्यांचं बघायचं वाकून? हे सोयीचं राजकारण झालं. नागालँडमध्ये पाठिंबा मागितला नसताना राष्ट्रवादीने दिला. महाराष्ट्रातही २०१४ दिला होतात. त्यामुळे शीशे के घरों में रहने वाले लोग दूसरों के घरों पर पत्थर नहीं फेंका करते हैं,” असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.