Homeक्रीडाParag Patil : ऑलिम्पिक पदक विजेता चालवतोय टॅक्सी; कोण आहे हा खेळाडू?

Parag Patil : ऑलिम्पिक पदक विजेता चालवतोय टॅक्सी; कोण आहे हा खेळाडू?

Subscribe

मुंबई : देशभरात अनेक असे खेळाडू आहेत, जे ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करतात पण त्यांचे पुढे काय होते? याबाबत खूप कमी जण उत्सुक असतात. देशभरात अनेक असे खेळाडू आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले आहे. पण आपल्या उदरनिर्वाहासाठी त्यांना इतर मार्ग अवलंबावी लागतात. अशामध्ये भारतासाठी दोन सुवर्ण, 11 रौप्य आणि 3 कांस्य पदक जिंकणारे पराग पाटील सध्या मुंबईत ओला टॅक्सी चालवत असल्याचे निर्दशनास आले. मुंबईतील एका युवा उद्योजकाने ही माहिती जगासमोर आणली. (Parag Patil who won Medal in International Games including senior Olympics driving taxi in Mumbai)

हेही वाचा : Yashasvi Jaiswal Caught : यशस्वी जैस्वालच्या वादग्रस्त विकेटवर सुनील गावस्करांचा संताप, म्हणाले – तंत्रज्ञान वापरू नका 

मुंबईतील युवा उद्योजक आर्यसिंग कुशवाह याने ऑलिम्पिक विजेते पराग पाटील यांची माहिती समोर आणली आहे. त्याने एक पोस्ट करत म्हटले की, “माझा ओला चालक एक ऑलिम्पिअन आहे. पराग पाटील, ज्येष्ठ ऑलिम्पिअन. तिहेरी उडी प्रकारात आशिया खंडात दुसरे स्थान मिळवलेले तसेच लांब उडी प्रकारात आशिया खंडात तिसरे ठरलेले पराग पाटील. प्रत्येकवेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व केले. कोणतीही स्पर्धा असो ते कधीच रिकाम्या हाताने परतले नाहीत. देशासाठी त्यांनी 2 सुवर्ण, 11 रौप्य आणि 3 कांस्य पदक पटकावले आहेत. तरीही त्यांच्याकडे कोणतेही आर्थिक साधन नाही.” अशी व्यथा त्याने मांडली आहे.

आर्यसिंग कुशवाहने पुढे म्हटले आहे की, “पराग पाटील यांच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी पुरेसा निधी नाही. त्यांना त्यांच्या ऍथलेटिक कारकीर्दीवर पाणी सोडावे लागले. पराग यांना जो कोणी मदत करू शकेल, त्या प्रत्येकासाठी ही पोस्ट आहे. जेणेकरून पराग पुन्हा भारताचे प्रतिनिधित्व करून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला विजय मिळवून देतील.” असे आवाहन त्याने यावेळी केले आहे. यावरून त्याच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच, देशातील व्यवस्थेला अनेकांनी लक्ष्य केले आहे.

कोण आहेत पराग पाटील?

पराग पाटील यांनी 30 व्या वर्षी आपली नोकरी सांभाळत आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी 2013 च्या आंतरराष्ट्रीय दिग्गज ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पहिल्यांदा देशाचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत त्यांनी देशासाठी तीन रौप्य पदके पटकावली होती. त्यांनी 2015 मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियन मास्टर्स गेम्ससह अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. यामध्ये त्यांनी दोन सुवर्ण तसेच दोन रौप्यपदक पटकावले. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांसाठी पराग पाटील यांनी अनेकदा उच्च व्याज कर्जाद्वारे निधी मिळवला आहे. इटलीमधील वरिष्ठ ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी त्यांनी तब्बल 17 टक्के मासिक व्याजदराने पैसे घेतले. तरीही त्यांना निधीच्या कमतरतेमुळे त्यांनी अनेक कष्ट सहन करत एक रौप्य आणि दोन कांस्य पदके जिंकले. तरीही मायदेशात परतल्यानंतर त्यांना फारशी ओळख किंवा समर्थन मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा पडला त्यामुळे उदरनिर्वाहासाठी त्यांना टॅक्सी चालवावी लागली.


Edited by Abhijeet Jadhav