मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला. यावेळी परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांचा दारुण पराभव केला. यावेळी धनंजय मुंडे यांनी तब्बल 1 लाख 40 हजार 224 पेक्षा अधिक मतांनी ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांच्या या विजयाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली. तसेच, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील त्यांचे कौतुक करत त्यांचा सत्कार केला. यावेळी फडणवीस त्यांना म्हणाले, इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या, असे विधान केले. (Parali Dhananjay Munde won in Maharashtra Election Devendra Fadanvis reaction)
हेही वाचा : Politics : गुवाहाटीला आलेला आमदार पराभूत झाला तर राजकारण सोडेल; एकनाथ शिंदे निवृत्ती घेणार?
काही महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या फूटीप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फुट पडली. त्यानंतर अजित पवारांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर दावा केला. यावेळी अजित पवारांसोबत धनंजय मुंडे होते. यानंतर लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युतीत असताना धनंजय मुंडे यांच्या लोकसभा मतदारसंघात मोठा फटका बसला होता. त्यामुळे विधानसभेतही मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागेल अशी चर्चा होती. पण, त्यांनी शरद पवारांच्या उमेदवाराला पराभूत करत लोकसभेच्या पराभवाची परतफेड केली. धनंजय मुंडे यांनी राजेसाहेब देशमुख यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. त्यामुळे त्यांच्या विजयाची चांगलीच चर्चा झाली.
परळीतील या विजयानंतर धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची रविवारी (24 नोव्हेंबर) भेट घेतली. यावेळी फडणवीसांनी परळीसह बीड जिल्ह्यातील महायुतीच्या विजयाबद्दल धनंजय मुंडे यांचे अभिनंदन केले. त्यांचा उपस्थितांसमोर सत्कारदेखील केला. यावेळी फडणवीस त्यांना, “तुम्ही विरोधकांना काहीच ठेवले नाही, इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या…” अशा शब्दात अभिनंदन केले. परळी विधानसभा मतदारसंघ आणि बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडे यांची साथ लाभली होती. त्यामुळे या जिल्ह्यातील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी त्यांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्यात सहापैकी पाच जागांवर महायुतीने विजय मिळवला. तर एका जागेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाने विजय मिळवला.