घरआतल्या बातम्यापरमबीर सिंहांच्या चौकशीतून महासंचालक संजय पांडे यांची माघार

परमबीर सिंहांच्या चौकशीतून महासंचालक संजय पांडे यांची माघार

Subscribe

आज परमबीर सिंहांच्या याचिकेवर सुनावणी

राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची चौकशी करण्यास असमर्थता दर्शवली आहे. परमबीर सिंह यांनी आरोप केल्याने संजय पांडे यांनी घाबरुन माघार घेतली का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र पांडे यांनी घाबरुन माघार घेतली नसून अनेक ज्येष्ठ विधीज्ञ यांच्या सल्ल्यानंतरच परमबीर सिंह यांच्या चौकशीतून माघार घेतल्याची माहीती गृहविभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने आपलं महानगरला दिली.

चौकशी करणार्‍या महासंचालक पांडे यांच्यावर परमबीर सिंह यांनी आरोप केल्याने त्याच अधिकार्‍याने चौकशी केल्यास बाजू कमकुवत होण्याची शक्यता असल्याने अखेर विधी व न्याय विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सल्ल्यानुसार या चौकशीतून पांडे यांनी माघार घेतल्याचेही तो अधिकारी म्हणाला. दरम्यान परमबीर सिंह यांनी उच्च न्यायालयात सरकारविरोधी केलेल्या याचिकेवर आज ४ मे रोजी सुनावणी होणार असल्याने त्यापूर्वीच पांडे यांनी सरकारला चौकीशीतून माघार घेण्याबाबत पत्र लिहीले आहे.

- Advertisement -

संजय पांडे यांच्याकडे चौकशी राहिली असती तर परमबीर सिंह यांना खूप कठीण गेले असते. अत्यंत कडक शिस्तीचा, प्रामाणिक अधिकारी असल्याने परमबीर सिंह यांना पांडे चौकशी करू नयेत, अशी मनोमनी इच्छा होती त्यामुळेच परमबीर सिंह यांनी मध्यस्थीसाठी संजय पांडे यांच्याशी संपर्क साधला, असे त्या अधिकार्‍याने सांगितले.

संजय पांडे यांनी याबाबत प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, त्यामुळे सध्या त्याबाबत काही बोलणे उचित नाही. राज्य सरकार त्याबद्दल योग्य निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दिली आहे.

- Advertisement -

मुंबई पोलीस दलातील दोन अधिकार्‍यांनी परमबीर सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याबद्दल आरोप केले आहेत. या प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची चौकशी करण्याची जबाबदारी राज्य सरकारने महासंचालक संजय पांडे यांच्याकडे सोपवली होती. परंतु, परमबीर सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच हायकोर्टात नवी याचिका दाखल करत ठाकरे सरकारवर नवे आरोप केले होते. यामध्ये संजय पांडे यांनी ज्या तक्रारी मी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात केल्या आहेत त्या मागे घेण्याचा सल्ला दिला होता, असा आरोप परमबीर यांनी याचिकेत केला आहे. तसेच त्यांनी संजय पांडे यांच्यासोबत झालेल्या व्हॉटस्अ‍ॅप संभाषणाचे रेकॉर्डिंग देखील उच्च न्यायालयात सादर केले आहे. त्याची सुनावणी मंगळवारी होणार आहे.

‘१५ एप्रिल रोजी महासंचालक संजय पांडे यांची भेट घेतली असता त्यांनी आपल्याला अनिल देशमुखांविरोधातील तक्रार मागे घेण्यास सांगितले. सिंह यांनी ही तक्रार मागे घेतली नाही, तर त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल करण्याची तयारी राज्य सरकार सुरू करेल’, असेही पांडे म्हणाल्याचे सिंह यांनी याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे मला परमबीर सिंह यांच्या चौकशीतून मुक्त करावे असे पत्र महासंचालक संजय पांडे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह ) मनूकुमार श्रीवास्तव यांना लिहीले होते. त्यावरून पांडे यांनी घाबरून माघार घेतली का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र आपलं महानगरला मिळालेल्या माहितीनुसार ज्येष्ठ विधीज्ञांच्या सल्लानेच पांडे यांनी माघारीचे पत्र गृहविभागला लिहील्याचे कळते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -