परमबीर सिंह यांना फरार घोषित केलं म्हणजे काय?, कोणत्या गुन्ह्यांमध्ये फरार घोषित करतात?

parambir singh

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना बुधवारी अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने खंडणीच्या प्रकरणात फरार घोषित केले आहे. मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांना फरारी घोषित करण्यात आलेले हे पहिले प्रकरण आहे. परमबीर सिंह हे महाराष्ट्रातील दुसरे सर्वात वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी होते. दरम्यान, परमबीर सिंह यांना फरार घोषित केले म्हणजे काय केले? याचा नेमका अर्थ काय होतो?

कोणाला फरार घोषित केले जाते?

ज्याच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे ती व्यक्ती फरार झाली असेल किंवा कारवाईपासून पळ काढण्यासाठी कुठेतरी लपून बसली असेल तर न्यायालय त्या व्यक्तीला फरार घोषित करते.

कोणत्या आरोपांसाठी फरार घोषित केले जाते?

  • खंडणीच्या प्रकरणातील आरोपीला फरार गुन्हेगार म्हणन घोषित केले जाते.
  • हत्येच्या प्रकरणातील आरोपीला फरार गुन्हेगार घोषित केले जाते.
  • खून करण्यासाठी अपहरण किंवा अपहरण; एखाद्या व्यक्तीला गंभीर दुखापत पोहोचवणे, बंदीवान करणे यासाठी एखाद्या व्यक्तीचे अपहरण करणे
  • चोरी करणे किंवा लुटण्याचा प्रयत्न करणे; चोरी करताना दुखापत; हत्येसह डकैती/लुटमार करणे; मृत्यू किंवा गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न करून दरोडा टाकणे, प्राणघातक शस्त्रांसह दरोडा/ दरोडा टाकण्याचा प्रयत्न; दरोडा घालण्याची तयारी करणे; दरोडेखोरांच्या टोळीशी संबंधित असणे
  • घर आदी नष्ट करण्याच्या उद्देशाने आग किंवा स्फोटक पदार्थ बाळगणे

परमबीर सिंह यांच्यावर काय आरोप आहेत?

गोरेगाव येथील हॉटेल बोहो अ‍ॅण्ड रेस्टॉरंट हे विनादिक्कत सुरू रहावे, त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करू नये, म्हणून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचा तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाझे याने तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरून लाखो रुपयांची खंडणी उखळली, अशी तक्रार हॉटेल मालक बिमल अग्रवाल यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात केली होती. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सचिन वाझे, खासगी इसम अल्पेश पटेल, रियाज भाटी, विनय सिंह उर्फ बबलू, सुमित सिंह उर्फ चिंटू यांच्याविरुद्ध खंडणी, धमकी देणे, कट रचणे, पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.