परभणी : मागील काही दिवसांपासून विविध घडामोडींनी मराठवाड्यातील बीड, परभणी परिसर चर्चेचा विषय ठरत आहे. अशात माणुसकीला काळीमा फासणारी बातमी परभणीतून समोर आली आहे. वंशाच्या दिव्यासाठी पतीनं पत्नीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पहिल्या दोन मुली जन्माला आल्या, पण तिसरीही मुलगीच झाल्याने संतप्त पतीने महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकत तिला जिवंत जाळलं. याप्रकरणी उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला असून, सध्या पोलीस संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत असल्याची माहिती समोर येत आहे. (Parbhani Crime Shocking Instead of a son a third daughter was born Angry husband immediately burned his wife alive)
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, परभणीतील गंगाखेड नाका परिसरात राहत असलेल्या एका पतीनं त्यांच्या पत्नीला जिवंत जाळलं. पहिल्या दोन मुली जन्माला आल्यानंतर तिसरी सुद्धा मुलगीच जन्माला आल्याच्या रागात पतीनं पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकत तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जीव वाचवण्यासाठी पेटलेल्या अवस्थेत पत्नी घराबाहेर पडली. या घटनेनंतर महिलेला परभणीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान महिलेचा मृत्यी झाल्याची माहिती समोर येत आहे.
कुंडलीक काळे असे त्या पतीचं नाव असून मैना काळे असं त्याच्या पत्नीचं नाव होतं. गुरुवारी (26 डिसेंबर) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. महिला जीव वाचवण्यासाठी बाहेर पडली असता तेथील दोन दुकानांना सुद्धा आग लागली. पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे परभणीत एकच खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी कोतवाली पोलिसांनी पती कुंडलीक काळे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाची राज्य महिला आयोग रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली. या संपूर्ण घटनेचा तपास केला जाईल आणि आरोपी पती विरोधात कारवाई केली जाईल अशी माहिती रुपाली चाकरणकर यांनी दिली. तसेच, माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येईल आणि पतीवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा – Amey Khopkar : अभिनेत्रींवर खोटे आरोप करत प्रसिद्धी मिळवणं थांबवा; मनसेचा सुरेश धस यांना इशारा