महाराष्ट्रातील IAS अधिकाऱ्याचा कोरोनामुळे बळी; उपचारादरम्यान पुण्यात निधन

परभणीच्या सुधाकार शिंदे यांचे कोरोनामुळे निधन

देशासह राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून राज्यात सध्या बाधितांचा आकडा वाढून १५ लाख ०६ हजार ०१८ वर पोहोचला आहे. राजकीय नेते मंडळीनंतर आता प्रशासकीय अधिकाऱ्याला देखील कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रातील एका तरुण आयएएस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. २०१५ बॅचचे परभणीचे आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांचे कोविडमुळे निधन झाले आहे. सध्या ते त्रिपुरा राज्यात शिक्षण विभागात कार्यरत होते.

उपचारादरम्यान झाला मृत्यू

सुधाकर शिंदे हे साधारण ३४ वर्षांचे होते. गावाकडे आल्यानंतर त्यांना कोरोना झाला. सुधाकर शिंदे सुट्टी असल्याने दोन आठवड्यांपूर्वी कुटुंबीयांसह गावी आले होते. परभणीच्या पालम तालुक्यातील उमरा गावात त्यांचे वडील चार भाऊ राहतात. या ठिकाणी आल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना नांदेड येथील गुरुगोविंदसिंग शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तब्येत खालवल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले. औरंगाबादवरून पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकला त्यांना हलवण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

२०१५ साली झाले आयएएस अधिकारी

मिळालेल्या माहितीनुसार, सुधाकर शिंदे हे त्रिपुरा राज्यात सहसचिव अर्थ मंत्रालय पदावर कार्यरत होते. त्यांचे शालेय शिक्षण परभणी येथिल नवोदय विद्यालयात झाले होते. औरंगाबाद येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते स्पर्धा परिक्षांकडे वळले होते. औरंगाबाद येथून महाविद्यालय शिक्षण पूर्ण करून ते पुणे व नंतर दिल्ली येथे युपीएससी परीक्षा देण्यासाठी गेले आणि २०१५ साली आयएएस अधिकारी झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन वर्षाची मुलगी असून त्यांच्या जाण्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


Corona In Maharashtra: दिलासादायक! आज दिवसभरात १७,३२३ रुग्णांनी केली कोरोनावर मात