परभणी – परभणीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीचे विटंबन प्रकरणाने हिंसक वळण घेतले. आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, या बंदला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी करुन घेण्यासाठी दुकानांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. तसेच पोलिसांच्या गाडींवर ही दगडफेक करण्यात आली, काही गाड्यांची मोडतोडही आंदोलकांकडून करण्यात आली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी ॲक्शन घेत, या आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळाले. तसेच शहरांमध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुपारपर्यंत शांततेत सुरू असलेल्या या बंदला अचानक हिंसक वळण लागले. या प्रकरणी परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश दिले असून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
जमावबंदीचे आदेश, इंटरनेट बंद
परभणींमध्ये संविधान प्रतिकृतीची विटंबना घडल्यानंतर लोक संतप्त झाले. आज बंद पुकारण्यात आला. मात्र या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण मिळाले. आंदोलन हिंसक झाल्यानंतर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शहरात जमावबंदीचे आदेश दिले आहे. त्यासोबतच मोबाईल फोन, टेलिफोन, फॅक्स केंद्र, झेरॉक्स केंद्र, इंटरनेट सेवा बंद करण्या आली आहे. जिल्हाधिकारी गावडे यांनी आंदोलक आणि आंबेडकरी चळवळीतील नेत्यांशी संवाद साधत शांततेचे आवाहन केले आहे. तर, मराठवाड्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनीही शांततेचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आता जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे.
जिल्हाधिकारी यांचे आदेश 11 डिसेंबर पासून पुढील आदेशा मिळेपर्यंत लागू राहतील, असे सांगण्यात आले आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीवर हे आदेश लागू असतील, त्याची अंमलबाजवणी सर्व यंत्रणांनी करावी, असे म्हटले आहे. त्यासोबतच प्रत्येकाला हे आदेश सांगणे शक्य नाही, त्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्द करावे, असेही आदेशात म्हटले आहे.
हेही वाचा : Parbhani Ambedkar Statue : 24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा… प्रकाश आंबेडकरांचा इशारा
Edited by – Unmesh Khandale