नागपूर : विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी पैशांचा व्यवहार करण्यात येत आहे, असा खळबळजनक दावा भाजपच्या आमदाराने केला आहे. विरोधात प्रश्न लावू. प्रश्न लावायचे नसतील, तर आम्हाला पैसे द्या, अशी ब्लॅकमेलिंग विरोधी पक्षातील नेत्यांच्या एजंटकडून केली जात आहेत, असा आरोप भाजपचे आमदार परिणय फुके यांनी केला आहे. त्यामुळे हे झारीतील शुक्राचार्य कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना परिणय फुके म्हणाले, “विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी पैशांची मागणी केली जात आहे. त्यासह विरोधात प्रश्न लावू. प्रश्न लावायचे नसतील, तर आम्हाला पैसे द्या, अशी ब्लॅकमेलिंग विरोधी पक्षातील नेत्यांच्या एजंटकडून केली जात आहे. याचे ऑडिओ आणि व्हिडिओ क्लीप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आले आहेत. यासंदर्भात चौकशीची मागणी केली आहे.”
“याची आधी पोलिसांकडून चौकशी करण्यात येईल. गरज पडली, तर एसआयटी चौकशीची मागणी करण्यात येणार आहे. आठ ते दहा लोक यात सामील आहेत. विरोधी पक्षातील सगळे आमदार यात नाहीत. काही पक्षाचे कार्यकर्ते आहेत. एका नेत्याचा डावा आणि उजवा हात सुद्धा यात सामील आहे,” असे परिणय फुके यांनी सांगितले.
कोणीही असुद्या कारवाई करणार…
यासंदर्भात विधानपरिषदेत बोलताना मंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, “कोणीही असुद्या, अशा पद्धतीने कोण ब्लॅकमेल करत असेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.”
हेही वाचा : मशीद पाडताना नागरिक आडवे आले, न्यायालयाने ठाणे मनपा अन् पोलिसांनाच खडसावले; म्हटले, आता…