आजपासून संसदेचं विशेष अधिवेशन सुरू होत आहे. पाच दिवस हे अधिवेश चालणार आहे. अधिवेशापूर्वी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. ही बैठक पार्लमेंट लायब्ररी इमारतीत पार पडली होती. यावेळी विरोधकांनी महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याची मागणी केली. लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी एकूण जागांपैकी एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्याची तरतूद करावी, अशी विरोधकांची मागणी आहे. परंतु असं असलं तरीही अधिवेशनात कोणते निर्णय होणार हे गुलदस्त्यात आहे. विरोधकांची मागणी नसताना पंतप्रधान मोदी यांनी हे अधिवेशन बोलावल्याने आजच्या अधिवेशनात मोदींचं धक्कातंत्र पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. या अधिवेशनात संविधान सभेपासून मागील 75 वर्षांतील आठवणींना उजाळा दिला जाणार असल्याचं सांगण्यात आलं. (Parliament Special Session The special session of Parliament begins today What is the purpose find out)
असं असेल विशेष अधिवेशन
या अधिवेशनाची सुरुवात जुन्या संसद भवनात होणार आहे. दुसऱ्या दिवशी 19 सप्टेंबरला जुन्या संसद भवनातच फोटो सेशनचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याच दिवशी सकाळी 11 वाजता सेंट्रल हॉलमध्ये कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर खासदार नवीन संसद भवनात पोहोचतील. अधिवेशनाची बैठक 19 सप्टेंबरलाच नवीन इमारतीत होणार असून तिथे 20 सप्टेंबरपासून नियमित कामकाज सुरू होणार आहे.
(हेही वाचा: Shivsena : शिवसेना कोणाची, सोमवारी सर्वोच्च निर्णय; ठाकरे गटाचा ‘यामुळे’ वाढला विश्वास )
‘या’ मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा
- जी-20 च्या यशस्वी आयोजनासाठी मोदींचं कौतूक
- महिला आरक्षण विधेयक येण्याची शक्यता
- रोहिणी आयोगाच्या शिफारशी स्वीकरल्या जाऊ शकतात
- चंद्रयान आणि सुर्ययान मोहिमेत भारतानं मिळवलेल्या यशाबाबत मोदींचं अभिनंदन करणार
- जम्मू काश्मीरमधील वाढते दहशतवादी हल्ले
- विरोधक जात निहाय जनगणनेची मागणी करणार
- मराठा आरक्षणावर महाराष्ट्रातील खासदार आक्रमक भूमिका घेऊ शकतात
- शेतकऱ्यांच्या एमएसपीचा मुद्दा, मणिपूर, भारत इंडिया वादावरून, भारत चीनच्या सीमावादावरून विरोधक आक्रमक
नव्या गणवेशात दिसणार कर्मचारी
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने नवीन संसद भवनात कामकाजाला सुरुवात होणार असून, नवीन संसद भवनात कर्मचारी नवीन गणवेशात दिसणार आहेत. मार्शल, सुरक्षा रक्षक, अधिकारी, चेंबर अटेंडेट यांना यानिमित्तानं नवीन गणवेश दिले जाणार असून ही मंडळी त्याच गणवेशात दिसणार आहेत.
नव्या संसदेत कर्मचाऱ्यांना बंद गळ्याच्या सूट ऐवजी गुलाबी रंगाच्या नेहरू जॅकेट आणि खाकी पँट परिधान करावी लागणार आहे. या जॅकेटवर कमळाची फुलं असणार आहेत. तर, मार्शलच्या नवीन पोषाखात आत मणिपूर पगडीचा समावेश करण्यात आला आहे. संसदेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या निळ्या रंगाच्या सूटची जागा आता सेनेच्या पोषाखात असणार आहे.