घरताज्या घडामोडीदुष्काळी पारनरेच्या घरवापसीने नेत्यांच्या भरल्या प्रसिद्धीच्या घागरी!

दुष्काळी पारनरेच्या घरवापसीने नेत्यांच्या भरल्या प्रसिद्धीच्या घागरी!

Subscribe

पाच नगरसेवकांच्या घरवापसीने निलेश लंके आणि अजित पवार यांनी मात्र स्वत:चा राजकीय ‘भाव’ वाढवून घेतला.

अख्ख्या राज्याची सूत्रे मुख्यमंत्री म्हणून हाती असलेल्या उद्धव ठाकरे यांनी आणि त्यांच्या चाणक्य समजल्या जाणार्‍या स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांनी नगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीच्या पाच नगरसेवकांसाठी चार दिवस जे आकाशपाताळ एक केले त्याचा फायदा ना शिवसेनेला झाला, ना तोटा राष्ट्रवादीचा झाला. गेलेल्या पाच नगरसेवकांच्या घरवापसीने निलेश लंके आणि अजित पवार यांनी मात्र स्वत:चा राजकीय ‘भाव’ वाढवून घेतला. त्याचवेळी आमदारकीच्या बोहल्याचे वेध लागलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी पारनेरच्या ओसाड जमिनीवर आपल्या प्रसिद्धीची घागर मात्र काठोकाठ भरुन घेतली.

राज्यातील सधन जिल्ह्यांपैकी एक असलेल्या नगर जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये बारा आमदार आहेत. यातील अकोले, कोपरगाव, राहुरी, नगर, कर्जत-जामखेड आणि पारनेर येथे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. संगमनेर आणि श्रीरामपूर येथे काँग्रेसचे आमदार आहेत. नेवाशाचा गड शेतकरी क्रांतीच्या शंकरराव गडाख यांच्याकडे आहे. तर राहाता, श्रीगोंदा आणि पाथर्डी येथे भाजपचे आमदार आहेत. सहकारासाठी आणि साखर कारखान्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सधन नगर जिल्ह्यात एक महानगरपालिका आणि सहा नगरपालिका आहेत. महानगर पालिकेत सर्वाधिक २४ नगरसेवक शिवसेनेचे असून सेना विरोधी बाकावर आहे. तर सर्वात कमी म्हणजे १८ नगरसेवक असलेल्या भाजपने राष्ट्रवादीच्या १९ नगरसेवकांच्या साथीने बाबासाहेब वाकडेंना महापौरपदी बसवलंय. सहा नगरपालिका असून त्यात श्रीगोंदा, संगमनेर, श्रीरामपूर, राहता, राहुरी आणि देवळाली प्रवरा यांचा समावेश आहे. जिल्ह्यात पाच नगरपंचायती असून त्यात अकोले, नेवासा, शेवगाव, पाथर्डी आणि पारनेर यांचा समावेश आहे. यापैकी दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणार्‍या पारनेरने गेले चार दिवस राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडचे पाणी पळवले होते.

- Advertisement -

पारनेरमध्ये नगरपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आहे, अर्थात हे नगरसेवक शिवसेनेच्या भगव्यापेक्षा राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यावर विश्वास ठेवण्यात धन्यता मानतात. निलेश लंके जिकडे जातील तोच आपला पक्ष असे मानणारे नेते. हे पाच नगरसेवक निवडणुकीला अवघे चार महिने असताना राष्ट्रवादीत गेले. १७ नगरसेवकांच्या या पंचायतीत माजी आमदार विजय औटी यांची अरेरावी, एकाधिकारशाही आणि फटकळपणा याला कंटाळून हे नगरसेवक निलेश लंकेंच्या पाठी गेले. विजय औटींच्या तुलनेत निलेश लंके हा जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. कुणाही फाटक्या माणसाच्या खांद्यावर हात ठेवून खास शैलीत संवाद साधण्यात वाकबगार. त्यामुळे लहान थोरांना लंके आपल्या घरातला माणूस वाटतो. कधीकाळी नव्हे तर आजही हाडाचा शिवसैनिक असलेले निलेश लंके एकेकाळी सेनेचे तालुकाप्रमुख होते. आजही आपल्या मनगटावर शिवबंधन मिरवणार्‍या बाळासाहेब ठाकरेंच्या या कट्टर शिवसैनिकाने पारनेर इथल्या उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेत तत्कालीन आमदार विजय औटींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर त्यांना पक्षशिस्तीचा भंग केल्यावरून सेनेबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ अजित पवारांची बॅटरी टाकून मनगटावर बांधले.

लंकेंचा साधेपणा, कुणालाही मदत करण्याची तयारी आणि समोर विजय औटींच्या अरेरावीला कंटाळून पारनेरकरांनी लंकेंना भरघोस मताधिक्क्याने विधानसभेत पाठवले. विधानसभेचे उपाध्यक्ष असलेल्या औटींच्या पराभवामुळे सेनेची फजिती झाली. खरं तर निलेश लंके हा फाटका तरुण निवडून येणार नाही म्हणूनच विजय औटींना १५ वर्षांपूर्वी काँग्रेसमधून येऊनही सेनेचे तिकीट मिळाले होते. विजय औटी यांच्या आधी तेव्हा ज्ञानेश्वर वाफारे काँग्रेसमधून सेनेत आले होते. त्यांचे विधानसभा तिकीट निश्चित होत असतानाच त्यांचा पतपेढी घोटाळा चव्हाट्यावर आला आणि विजय औटी यांचे नशीब काँग्रेसमधून येऊनही फळफळले. तेव्हा सडपातळ शरीरयष्टी, साधी-फाटकी राहणी यामुळे निलेश लंकेंचा विधानसभेला निभाव लागणार नाही, असा समज ‘मातोश्री’च्या थिंकटँकने करुन घेतला. तो २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तीन वेळा आमदार आणि उपाध्यक्ष असलेल्या विजय औटींना धूळ चारुन लंके यांनी खोटा ठरवला. आमदार झाल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची परवानगी घेऊन निलेश लंके यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांचेही आशीर्वाद घेतले. त्या भेटीत उद्धव ठाकरे यांनी निलेश तुला ओळखण्यात माझी चूक झाली, अशी प्रांजळ कबुलीही दिली.

- Advertisement -

निलेश लंके यांची पत्नी २०१७ मध्ये जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या तिकीटावर सुपा मतदारसंघातून निवडून आल्याने सेनेतच आहे. त्या सेनेतच राहिल्या याचे ढोलही सेनेच्या काही उतावळ्यांनी चार दिवस जोरात वाजवले. त्याला चॅनेल्समधून ब्रेकींग न्यूज चालवून काही सेना पदाधिकार्‍यांनी चार दिवस प्रसिद्धीही मिळवली. पण नगरचे राजकारण पक्षाभोवती नाही तर नेत्यांभोवती आणि सत्तेभोवती फेर धरते याची पुन्हा एकदा प्रचिती आलीये. कारण भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची पत्नी शालिनीताई विखे-पाटील या लोणीमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्यात. तर श्रीगोंद्याचे काँग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे वर्षभरापूर्वी विधानसभेला भाजपमध्ये आलेत, पण त्यांची पत्नी अनुराधा नागवडे जिल्हा परिषद सदस्य असल्याने काँग्रेसमध्येच राहिली आहे. त्यामुळे निलेश लंकेंची पत्नी सेनेतच राहिली म्हणून उत्सव करणार्‍यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:च्या सत्तेतील कोणतीही पदरमोड न करता सेनेचेच नगरसेवक परत पाठवून आपल्या अंगचे दातृत्व आणि मोठेपणा दाखवून दिला.

त्याचवेळी एका दुष्काळी तालुक्यातील पाच नगरसेवकांसाठी आकांडतांडव करणार्‍या मुख्यमंत्री ठाकरेंकडून पाणीप्रश्न सोडविण्याचे ठोस आश्वासन मिळवून निलेश लंके यांनी मात्र चार दिवसांत मिळालेल्या प्रसिद्धीने, खिशाने फाटका असूनही राजकीय प्रथितयशांच्या यादीत स्वत:ला मोठ्या खुबीने बसवून घेतले. त्याचवेळी कुणालाही राजकीय फायदा नसलेल्या दुष्काळी तालुक्याच्या चार दिवसीय घरवापसी नाट्याने निलेश लंकेंपाठोपाठ मिलिंद नार्वेकर यांनी आपल्या प्रसिध्दीची आणि श्रेयाची घागर काठोकाठ भरुन घेतली. मुंबईतल्या या घरवापसी नाट्याने पारनेरकरांचे मनोरंजनही झाले आणि विजय औटींनी १५ वर्षे भिजत घातलेले पाणी प्रश्नाचे घोंगडेही वाळले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -