भाग १ : कटू वास्तव ! अल्पवयीन मुलांमध्ये वाढले महिलांचे आकर्षण

भाच्याने मामीचा विनयभंग केल्याची घटना चिंताजनक

नाशिक : शहरातील १६ वर्षीय मुलीने शारीरिक आकर्षणातून २५ वर्षीय मामीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली आहे. नातेसंबंधातील व्यक्ती वा आपल्यापेक्षा मोठ्या वयातील व्यक्तींविषयी अल्पवयीन मुलांमध्ये आकर्षण गेल्या काही वर्षांत कमालीचे वाढत असल्याची गंभीर बाब यानिमित्ताने पुढे आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूररोड परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेने गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला ही संशयित आरोपीची मामी आहे. यापूर्वी दोघांमध्ये मनमोकळा संवाद सुरू असायचा. मामीसुद्धा त्याचे लाड करायची. मात्र, मुलामध्ये दिवसेंदिवस मामीविषयी आकर्षण वाढत गेले. सोशल मीडियावर तो रोमँटिक व्हिडीओ, गाणी नेहमीच पाहायचा. त्यातून त्याच्यामध्ये आकर्षणाची भावना जागृत झाली असावी असा कयास आहे. किशोरवयीन मुलगा दोन वर्षांपासून मामीला लाईक करायचा. काही दिवसांपूर्वी त्याचे आई-वडील बाहेरगावी गेले होते. तो घरीच एकटाच असल्याने तो भयभीत होवू नये, म्हणून मामी मुक्कामी आली. त्याने ही संधी साधत मामीकडे प्रेमभावना व्यक्त केली. तुम्ही मला खूप आवडता, आपण दोघे शारीरिक संबंध ठेवू, अ्रशी धक्कादायक मागणी केली. हे केवळ मागणीवरच थांबले नाही तर त्याने मामीचा विनयभंगही केला.

 या मुलाच्या मामीने कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका करुन घेत सकाळी थेट गंगापूर पोलीस ठाणे गाठले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत संशयित मुलास ताब्यात घेतले. त्याच्याकडे विनयभंगाबाबत विचारणा केली असता त्याने गुन्ह्याचे कबुली दिली. मामी आवडत असल्याने तिच्याकडे आकर्षित झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मुलाचे वय १६ असल्याने पोलिसांनी त्याला बालन्यायालयासमोर हजर केले. या ठिकाणी मुलास अल्पवयात होणार्‍या चुका आणि त्याचे होणारे दूरगामी परिणाम याबाबत माहिती देत समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर मुलास आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे मुलाच्या कुटुंबियांना मनस्ताप सहन करावा लागला. मुलाकडे लक्ष ठेवण्यासह त्याच्या सुसंवाद ठेवला जाईल, त्याला चांगल्या-वाईट गोष्टींची जाणीव करुन दिली जाईल, असे सांगत कुटुंबिय मुलाला घेऊन घरी आले. या प्रकरणांमुळे नातेसंबंधांतील विश्वासार्हता कमी होतानाच सामाजिक स्वास्थ्यावरदेखील त्याचा परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

१६ वर्षीय मुलाने शारीरिक आकर्षणापोटी मामीचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा पोलीस सखोल तपास करत आहेत. रियाज शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गंगापूर