अस्मितेचा विषय, त्यांच्या भ्रष्टाचाराच्या मुळापर्यंत जाणार; पार्थ पवार यांचा भाजपला इशारा

Parth Pawar
अस्मितेचा विषय, त्यांच्या भ्रष्टाचाराच्या मुळापर्यंत जाणार; पार्थ पवार यांचा भाजपला इशारा

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापे मारले आहेत. दरम्यान, आता पार्थ पवार यांनी भ्रष्टाचारावरुन भाजपला इशारा दिला आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या मुळापर्यंत जाणार असा इशारा पार्थ पवार यांनी भाजपला दिला आहे.

पार्थ पवार यांनी ट्विट करत भाजपला इशारा दिला आहे. त्यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. पवना आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पावरुन पार्थ पवार यांनी भाजपला इशारा दिला आहे. पवना आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पात भ्रष्टाचार करत असल्याची तक्रार आपल्याकडे आली असल्याचं पार्थ पवार म्हणाले. “सर्वांच्याच अस्मितेचा विषय आणि मातेसमान नदीतून पैसे खाण्याचा उद्योग पिंपरी चिंचवड भाजपने चालवल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या आम्ही मुळापर्यंत जाणार,” असा इशारा देत हीच का स्मार्ट सिटी असा सवाल केला आहे.

पार्थ पवार यांनी यानंतर अजून एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी “सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।” असं ट्विट पार्थ पवार यांनी केलं आहे. भाजपच्या हातून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ता काबिज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत १६ ऑक्टोबरला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.