घरमहाराष्ट्रयुतीचे साईड इफेक्ट्स; २४ तासात नाराजी नाट्याला सुरूवात!

युतीचे साईड इफेक्ट्स; २४ तासात नाराजी नाट्याला सुरूवात!

Subscribe

१८ फेब्रुवारीला भाजप अध्यक्ष अमित शाह, शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीची घोषणा करून हातमिळवणी केली खरी. मात्र, दोन्ही पक्षांच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांची मात्र 'मनसे' युती काही होत नसल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रात दिसून येत आहे.

बरीच चर्चा आणि अटी-प्रतिअटी अशा फेऱ्या केल्यानंतर अखेर युतीची घोषणा झाली. मात्र, घोषणा होऊन २४ तास देखील उलटत नाहीत, तितक्यात या युतीचे साईड इफेक्ट्स देखील जाणवू लागले आहेत. भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमधले अतंर्गत वाद आता समोर येऊ लागले आहेत. युतीच्या साईड इफेक्टची पहिली ठिणगी ही जालन्यात पडल्याचे पहायला मिळत आहे. आधीच येत्या आगामी निवडणुकीमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना आस्मान दाखवण्याची भाषा करणाऱ्या राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी ‘युती झाली असली तरी आपण दानवे यांच्या विरोधात मैत्रिपूर्ण निवडणूक लढवणार’, असल्याचे वक्तव्य केले आहे. ‘मी अजूनही मैदान सोडलेले नाही आणि सोडणारही नाही’, असे सांगत खोतकर यांनी ‘मी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रह धरणार आहे. ही लढाई मैत्रीपूर्ण होईल’, असं म्हटलं आहे.

आमचे वरिष्ठ आमच्या नाराजीची दखल घेतील आणि ही जागा भाजपाच लढेल अशी आम्हाला आशा आहे.

समीर पाटील, जिल्हा युवक सरचिटणीस, भाजपा


शरद पवार असं का म्हणाले? – सेना-भाजपला ४५ नाही, ४८ जागा मिळतील!

सिंधुदुर्गातही भांड्याला भांडं!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील भाजपा आणि शिवसेनेमधील स्थानिक नेत्यांमधील वाद समोर आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आपण विनायक राऊत यांच्यासाठी काम करणार नसल्याचे जाहीर केले केले होते. त्यातच युती झाल्यानंतर ते अधिकच आक्रमक झाले असून, आंगणेवाडीच्या जत्रेच्या दिवशी ते राजीनामा देणार असल्याची माहिती मिळत आहे. एवढंच नाही, तर ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचीही माहिती मिळत आहे. युतीच्या जागावाटपात रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाणार असून, तिथून शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांना पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळेच प्रमोद जठार नाराज असण्याची शक्यता आहे. दरम्यान याबबद्दल प्रमोद जठार यांना विचारले असता त्यांनी ‘नाणार प्रकल्पामुळे कोकणात रोजगार उपलब्ध होणार आहे आणि जो पक्ष नाणारला समर्थन देईल, त्याला माझा सपोर्ट असणार’, असे सांगितले.

आज मैदानात असलेले सर्वच उमेदवार रिफायनरी प्रकल्पाचे विरोधक आहेत. प्रकल्पाला जनतेतून विरोध आहे की नाही याचे खरे जनमत हवे असेल, तर प्रकल्पाचा समर्थक उमेदवार मैदानात पाहिजे. रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता असलेला प्रकल्प फालतू राजकारणापायी कोकणातून हटवला जाऊ नये, यासाठी मी मैदानात उतरणार आहे.

प्रमोद जठार, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष

- Advertisement -

जळगाव हवा शिवसेनेला!

जालना आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गप्रमाणे जळगावात देखील युतीत ठिणगी पडली आहे. युती झाली तरीही जळगाव लोकसभा मतदार संघ शिवसेनेकडे घेण्यासाठी आग्रही असल्याचे मत सहकार राज्यमंत्री गुलाराबराव पाटील यांनी व्यक्त केले. जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीसंदर्भात शिवसेनेची आज हॉटेल रॉयल पॅलेस येथे बैठक झाली. यावेळी जळगावचं तिकिट शिवसेनेलाच मिळावं अशी भूमिका मांडण्यात आली आहे. सध्या भाजपच्या तिकिटावर एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे जळगावमधून खासदार आहेत.

शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या युतीबाबत शिवसैनिकांची मते वेगवेगळी आहेत. काहींची स्पष्ट नाराजीही आहे. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेऊन आदेश देतील, तो आमच्यासाठी अंतिम असेल.

गुलाबराव पाटील, सहकार राज्यमंत्री


हेही वाचा – जनतेसाठी नाही, तर स्वार्थासाठी युती केली – नारायण राणे

पालघरमध्येही कार्यकर्त्यांचे राजीनामे!

दरम्यान, पालघर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेला सोडला जात असल्याने येथील भाजप कार्यकर्त्यांनी देखील राजीनामासत्र सुरू केले आहे. पालघर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची राजकीयदृष्ट्या सत्तेत मोठी पकड आहे. डहाणू आणि विक्रमगड हे दोन विधानसभा मतदार संघ भाजपच्या ताब्यात आहेत. त्याचबरोबर पालघर जिल्हा परिषदेतही भाजपचाच अध्यक्ष असून ४ पंचायत समितीत सत्तास्थानी असताना देखील पालघर लोकसभा मतदारसंघ हा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला जाणार आहे. यामुळे विक्रमगड तालुक्यातील भाजप तालुका अध्यक्ष संदीप पावडे यांनी जिल्हा अध्यक्षांना राजीनाम्याचे पत्र सादर केले आहे. त्यांच्यासोबत विविध पदाधिकाऱ्यांची देखील यात नावे आहेत.

पालघर लोकसभा अनेक वर्षे भाजपकडे राहिली. ही जागा भाजपाकडे रहावी. शिवसेनेकडे गेली तर भाजपामध्ये नाराजी वाढेल. त्यामुळे अनेकांनी राजीनामे दिले आहेत.

विनोद मेढा, तलासरी तालुका अध्यक्ष, भाजपा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -