एसटी संपावर तोडगा निघेना, पवार-परब बैठक निष्फळ

एसटी कर्मचार्‍यांची तीव्र नाराजी...

 मुंबई – गेल्या काही आठवड्यापासून सुरू असलेल्या एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी सकाळी साडेचार तास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत काहीही ठोस निर्णय झाला नाही, अशी माहिती स्वतः अनिल परब यांनीच पत्रकारांना दिली. यामुळे आझाद मैदानात आंदोलन करणार्‍या एसटी कर्मचार्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी, परब जर रोज तेच-तेच बोलत असतील, तर त्या बैठकीला अर्थ काय, असा सवाल केला आहे.

वरळीतील नेहरू विज्ञान केंद्रात शरद पवार, अजित पवार आणि अनिल परब यांच्यात बैठक झाली. त्यानंतर अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांकडे या बैठकीबाबतची माहिती दिली. बैठकीत पवारांनी संपाची माहिती घेतली. एसटी कर्मचार्‍यांनी संप मागे घ्यावा म्हणून कोणते पर्याय असू शकतात, याची चर्चा केली. या बैठकीत संपाबाबत समितीसमोर कोणती बाजू मांडायची यावरही विचार झाला. एसटीचे उत्पन्न कसे वाढू शकते, यावरही चर्चा झाली. मात्र, कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. यावर पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेणार आहे, अशी माहितीही परब यांनी दिली. दरम्यान, आंदोलनासाठी बसलेले भाजप नेते गोपीचंद पडाळकर यांनी आजच्या बैठकीवरून सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. सरकारला आंदोलनावर तोडगा काढायचा असेल तर त्यांनी संपकर्‍यांशी बोलावे, असे ते म्हणाले.

दरम्यान, भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही या विषयावर सोमवारी भाष्य केले. शरद पवारांनी हा संप सोडवण्यासाठी पुढाकार घेतला असेल तर त्याचे स्वागतच आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यात स्पष्ट आश्वासन दिले आहे. ते झोपेत दिलेले नाही. त्याचे पालन व्हावे, इतकीच अपेक्षा असल्याचे मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. सरकारकडे फक्त एसटी कामगारांसाठीच पैसे नाहीत. हे सरकार ड्रग्स पार्टी करणार्‍यांना समर्पित आहे. सचिन वाझेंना समर्पित आहे. त्यामुळे सरकारने शेतकरी आणि कामगारांना समर्पित व्हावे, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लागवला.

एसटीच्या विलीनीकरणाचा मुद्दा हा न्यायालयाच्या समितीसमोर आहे. न्यायालय देईल तो निर्णय सरकार स्वीकारणार आहे. संपामुळे शाळेत जाणार्‍या मुलांचे आणि ग्रामीण भागातील लोकांचे हाल होत आहेत. संप मिटावा म्हणून संपकरी कर्मचार्‍यांच्या मागण्यांवर चर्चा झाली. वेगवेगळ्या पर्यायांवर चर्चा झाली. हा संप लवकरात लवकर संपावा. त्यामुळे कर्मचारी आणि एसटीचे नुकसान होत आहे. वेतनवाढीसंदर्भातही चर्चा झाली. हिवाळी अधिवेशनातही यावर चर्चा होईल, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.