घरमहाराष्ट्रसत्ताधार्‍यांचा उन्माद ठोकरला

सत्ताधार्‍यांचा उन्माद ठोकरला

Subscribe

राज्यात पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विरोधी काँग्रेस महाआघाडीच्या पारड्यात मतदारांनी भरघोस मतांची बेगमी दिली आहे. भाजप-सेना युतीचे सरकार लोकांच्या मनातून उतरल्याचे हे द्योतक मानले जात आहे. २०१४च्या निवडणुकीत दोन्ही पक्षांना ८३ संख्येवर रोखलेल्या काँग्रेस आघाडीने शंभरचा पल्ला गाठला आहे. सरकारची चुकीची धोरणे, ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांचा दुरुपयोग करण्याची सत्ताधार्‍यांची कृती विरोधकांना भक्कम करण्यात कारणीभूत ठरल्याचे काँग्रेस आघाडीने नमूद केले आहे. सत्तेचा उन्माद लोक कधीच स्वीकारत नाहीत. भाजप-युतीच्या सत्तेला बसलेला धक्का ही त्याचीच परिणती आहे. जमीन सोडून जाणार्‍यांना मतदार धक्का देतात. मतं मांडताना सीमा ओलांडणे याला लोक कधीच स्वीकारत नाहीत. राज्यात विधानसभेचे हाती आलेले निकाल हेच दाखवतात असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

मिशन २२०चा बाऊ करणार्‍यांना या निवडणुकीने जमिनीवर आणले असले तरी सेनेला घेऊन सत्तेत परिवर्तनाची कुठलीही शक्यता त्यांनी स्पष्टपणे फेटाळून लावली. विधानसभा निवडणुकीतील मतदानाचे निकाल येत असताना पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. मतदारांनी आमच्या आघाडीला समर्थ विरोधी पक्षाची जबाबदारी दिली आहे, दोन्ही काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कवाडेप्रणित रिपब्लिकन पार्टी या पक्षांना बरोबर घेऊन आगामी वाटचाल केली जाईल. आता समर्थ विरोधी पक्ष म्हणून आलेली जबाबदारी आम्ही पार पाडू, असे पवार म्हणाले. या निवडणुकीत आघाडीच्या सगळ्याच उमेदवारांना विशेषत: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मेहनतीने काम केल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. भाजप नेत्यांनी दाखवलेला सत्तेचा उन्माद राज्यातल्या जनतेला पसंत पडलेला नाही. सत्ता येते आणि जाते, पण सत्ता सांभाळणार्‍यांचे पाय जमिनीवर असले पाहिजेत. या सत्ताधार्‍यांचे विशेषत: भाजप नेत्यांनी जमीन सोडून कारभार चालवला होता.

- Advertisement -

नेत्यांनी किती टोकाची मते मांडावीत, याला काही मर्यादा असायला हवी. विरोधकांवर नको त्या टिपण्ण्या करायची भाजप नेत्यांमध्ये स्पर्धाच लागली होती. एकीकडे हे करताना विरोधी पक्षातल्या नेत्यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपल्याकडे घेण्याची कृती लोकांना पसंत पडली नाही. दुसरीकडे ईडीसारख्या यंत्रणांचा सरकारी पक्षाकडून विशेषत: भाजपकडून केला जात असलेला गैरवापरही लोकांच्या नाराजीत उतरला होता. याचा फटका सत्ताधारी पक्षांना बसला, असे पवार म्हणाले. याच निवडणुकीबरोबर लोकसभेच्या सातारा मतदारसंघाची पोटनिवडणूक पार पडली. या पोटनिवडणुकीत उदयनराजे यांच्या झालेल्या पराभवावर पवारांनी भाष्य केले. उदयनराजे यांनी साताराच्या गादीची प्रतिष्ठा ठेवली नाही. या गादीबद्दल लोकांमध्ये आदराची भावना आहे. मोदी, शहा यांना सातारात आणूनही त्याचा प्रभाव लोकांवर पडला नाही. अशा लोकांना मतदार धडा शिकवतात, असे पवार यांनी म्हटले. साताराकरांचे कौतुक करण्यासाठी शुक्रवारीच सातारात जाणार असल्याचे पवार यांनी पत्रकारांना सांगितले. राज्यातल्या निवडणुकीचा कल पाहून विरोधी पक्षांना एकत्र करून आगामी वाटचालीचा आराखडा ठरवला जाईल, असे पवार म्हणाले.

सेनेला पाठिंब्याचा प्रस्ताव नाही
निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देऊन सरकारमध्ये सामील होण्याचा कुठलाही प्रस्ताव आमच्यापुढे नाही. जे काही ठरवायचे ते आम्ही एकत्र बसून ठरवू. आता आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कल लोकांनी दिला आहे. जनमताचा आमची महाआघाडी आदर करेल. या निवडणुकीला पूरपरिस्थिती कारणीभूत आहे, असे आपल्याला वाटत नाही. कोल्हापुरात आम्ही चांगले यश घेतले तसे पुण्यातही यश मिळाले. पण पुण्यात काही पूरपरिस्थिती नव्हती.

- Advertisement -

मोदी, शहा, फडणवीसांचे आभार
राज्यातल्या या निवडणुकीच्या निकालात विरोधकांना अधिक ताकद देण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या नेत्यांनी निवडणुकीनिमित्त महाराष्ट्राचे दर्शन घेतले. या दर्शनात त्यांनी महाराष्ट्राच्या कल्याणाची भूमिका घेण्याऐवजी त्यांनी वैयक्तिक टीका केली. पवारांचे राजकारण संपले, त्यांना दिल्लीतही घर सोडावे लागणार, बारामतीला पाठवणार असली हेत्वारोपाची भाषा लोकांनाही आवडली नाही. पंतप्रधानांनी या भाषेऐवजी त्यांनी देश आणि राज्य कल्याणाचा विचार केला असता तर त्यांना फायदाच झाला असता, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -