मोराच्या मृत्यूच्या दु:खात अख्खा गाव उपाशी; अकोल्यातील हृदयद्रावक घटना

'रामू'च्या या अपघाती मृत्यूची सुचना गावकऱ्यांनी वनविभागाला दिली

Peacocks ramu death due to electric shock in antri village akola

रोज अंगणात येत दाणे टिपणारा, कोंबड्यांसोबत खेळणारा आणि रडणाऱ्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आपसुकच हस्या फुलवणारा रामू नावाचा मोर अकोल्यातील अंत्री गावातील सर्वांना अचानक सोडून गेला. गेल्या पाच वर्षांपासून त्याने अख्ख्या गावाला आपलसं केलं. मात्र बुधवारी उच्च प्रवाहाच्या विद्युत तारांवर बसल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूच्या दु:खात सारं अंत्री गाव उपाशी राहिलं. रामूच्या निधनाने नागरिकांना गावातील सारं भावविश्व बेरंगी झाल्याचं वाटू लागलय. रामूच्या दु:खात बुधवारी अंत्री गावात चुक पेटली नाही, येथील अनेक लहान, थोर लाडक्या रामू मोराच्या आठवणीत रडत होती.

गेल्या पाच वर्षांपूर्वी रामू नावाचा मोर अंत्री गावात आला होता. रामूचं अनेक गावकऱ्यांसाठी काही दिवस अप्रूप आणि आश्चर्यकारक वाटत होतं. मात्र जसे दिवस सरत गेले तसे रामू गावकऱ्यांमधलाच एक झाला. कोंबड्यांच्या आवरवण्यासह रामूच्या म्याँव- म्याँवनेही अंत्री गावाची पहाट सुरु व्हायची. दिवसभर रामू कधी कोणाच्या अंगणात तर गावभर फिरत बसायचा. मात्र बुधवार रामूचा काळ बनून समोर आला होता असचं म्हणावं लागेल. रामू फिरत असताना अचानक एका विद्युत प्रवाहाच्या तारेवर बसला. या तारेच्या शॉकने तो खाली कोसळला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. ही घटना गावाला चटका लावून जाणारी होती. गावकऱ्यांना ही बातमी समजतात गावात एकचं शोककळा पसरली.

रामूचा पिसारा फारचं सुंदर होता. पिसारा फुलवलेल्या रामूचं सौंदर्य अनेकांना घायाळ करणारं होत. मात्र त्याच्या जाण्याने आता अंत्री गावातील लोकांच्या मनात फक्त त्याच्या पिसाचे सप्तरंगचं राहिले आहेत. गावातील एकाही व्यक्तीने त्याचा पिसाला कधी हात लावला नाही, मात्र अनेकांनी त्याच्यासोबत फक्त फोटो काढले. त्यामुळे रामूच्या निधनानंतर आता गावकऱ्यांनी त्याला पिसांसह शेवटचा निरोप देण्याचा निर्णय घेतला. रामूच्या आठवणींचं मोरपीस कायम मनात जपून ठेवण्याचा गावकऱ्यांनी निर्णय घेतला. आणि अखेर अंत्री गावातील लोकांनी पाणावलेल्या डोळ्यांनी रामूला शेवटचा निरोप दिला.

‘रामू’च्या या अपघाती मृत्यूची सुचना गावकऱ्यांनी वनविभागाला दिली. यानंतर नविभागाचे क्षेत्र वनाधिकारी राजेंद्रसिंह ओवे, मानद वन्यजिव रक्षक बाळ काळणे, वनपाल गजानन इंगळे, वनरक्षक मोरे, गजानन म्हातारमारे, नाथ महाराज , यशपाल इंगोले यांनी घटनास्थळी पोहचत रामूला अंतिम निरोप दिला. रामूच्या मृत्यूने माणूस आणि एका पक्षातील अनोख्या मैत्रीचा शेवट झाल्याची भावना वनविभाग, वन्यजीव कार्यकर्ते आणि गावकऱ्यांनी व्यक्त केली.


हेही वाचा : राज्यात पावसाचा जोर ओसरला; अनेक ठिकाणी पूरस्थिती नियंत्रणात आल्याने शेतीची काम सुरु