घरमहाराष्ट्रकल्याणमध्ये ‘ओपन बार’ संस्कृती जोरात!

कल्याणमध्ये ‘ओपन बार’ संस्कृती जोरात!

Subscribe

कल्याणमध्ये विविध ठिकाणी उघडयावरच दारू पिण्याचा खुलेआम कार्यक्रम सुरू आहेत. याकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. एकिकडे पोलिसांकडू गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींवर तसेच अवैध दारू विक्रीवर कारवाईची मोहीम राबवली जात असतानाच, दुसरीकडे मात्र कल्याणमध्ये विविध ठिकाणी उघडयावरच दारू पिण्याचा खुलेआम कार्यक्रम सुरू आहेत. याकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. आदर्श आचारसंहितेत ओपन बार संस्कृतीची चर्चा कल्याणमध्ये जोरदारपणे सुरू आहे. यासंदर्भात जागरूक नागरिकांनी पोलिसांकडे तोंडी तक्रारीही केल्या आहेत. मात्र पेालिसांनी कानाडोळा केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील एका मद्यविक्री दुकानाच्या आसपास उघड्यावरच दारू पिण्याचा खुला कार्यक्रम सुरू आहे. इथल्या रस्त्यावरून शेकडो नागरिक आणि महिला ये-जा करीत असतात. या परिसरात असंख्य बार आहेत. हा परिसर अत्यंत रहदारीचा असल्याने येथे सकाळ-संध्याकाळ लोकांची मोठी वर्दळ असते. स्कायवॉकवर जाणारा जिना येथेच असल्याने आसपास घोळक्याने दारू पिणारे मद्यपी आणि फेरीवाल्यांमुळे लोकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होतो. त्यातही महिलावर्गाला येथून प्रवास करण्यास संकोच वाटत आहे. या दारुड्यांकडून छेडछाड होण्याची त्यांना भीतीही असते. यासंदर्भात शहरातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला या प्रकाराची माहिती दिली गेली होती, मात्र तरीही येथील ओपन बार सुरूच राहिल्याचे दिसत आहे. तसेच मुरबाड रोडवरील एका मद्यविक्री दुकानात काऊंटरवरच दारू पिण्याचे प्रकार चालत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. शहराच्या पश्चिमेला असलेल्या गांधारी पुलावर, कल्याण पूर्वेत महापालिकेचे ‘ड’ प्रभाग कार्यालय असलेल्या टेकडीवरील निर्जन भागात, नेतीवली टेकडी येथील निर्मनुष्य ठिकाणी झाडांच्या आडोशाला, ठाकुर्ली-कल्याणला जोडणाऱ्या ९० फुटी रस्त्याच्या फुटपाथवर, मोहोने रस्त्यावरील उल्हास नदीकाठच्या पंपहाऊसच्या आवारात, मोहोने येथील गणेश घाटलगत नदी किनारी, मांडा पूर्वेतील सावरकरनगर-चार्मस् हाइट रस्त्यावर निर्जन स्थळी तसेच चार्मस् हाइटलगतची टेकडी या ठिकाणी ओपन बार जोरात चालत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. नागरिकांना, विशेषत: महिलावर्गाला त्रासदायक ठरणाऱ्या या ‘ओपन बार’ला राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून आळा घातला जाणार का? असा सवाल कल्याणकरांमध्ये उपस्थित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -