घरCORONA UPDATECoronavirus : क्वारंटाईनमधील लोकांनी टाळ्या वाजवत मानले महापालिकेचे आभार!

Coronavirus : क्वारंटाईनमधील लोकांनी टाळ्या वाजवत मानले महापालिकेचे आभार!

Subscribe

चाळीतील कुटुंबांना महापालिकेच्यावतीने जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या गेल्या.

प्रभादेवी रेल्वे स्थानकाजवळील दया विरा चाळीतील तब्बल १२ हून अधिक रहिवाशांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे या संपूर्ण चाळीला आता क्वारंटाईनचे स्वरुप देत ‘बाधित क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे या चाळीतील कुणालाही घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे यासर्व कुटुंबांना महापालिकेच्यावतीने जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या. महापालिकेच्या कर्तव्यदक्ष आणि मानवतावादी धर्मामुळे या रहिवाशांना सुखद धक्का बसला आणि सर्व रहिवाशांनी चाळीच्या गॅलरीत उभे राहत महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी टाळ्या वाजवत त्यांना धन्यवाद दिले.

प्रभादेवी रेल्वे स्थानकाजवळील ‘दया वीरा’ या चाळीतील एका महिलेला प्रथम कोरोनाचा संसर्ग झाला. या महिलेला याची बाधा झाल्यानंतर त्यांच्या निकटच्या लोकांची व रहिवाशांची तपासणी केली असता, पहिल्या दिवशी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही संख्या १२ वर पोहोचली. तर गुरुवारीही यातील आणखी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे याठिकाणी कोरोनाग्रस्त आढळून आल्यामुळे याला बाधित क्षेत्र जाहीर करत रहिवाशांसह आसपासच्या नागरिकांसाठी हे क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले. त्यामुळे येथील सर्व चाळींना आता ‘क्वारंटाईनचे’ स्वरुप देण्यात आले.

- Advertisement -

‘बाधित क्षेत्र’ परिसरात लागू करण्यात आलेले नियम हे त्या परिसरातील नागरिकांच्या भल्यासाठीच असून ज्या व्यक्तींना संसर्ग झाल्याची शक्यता आहे, अशा व्यक्तींपासून इतरांना संसर्ग होऊ नये, या भावनेनेच अशाप्रकारे बाधित क्षेत्र तयार करण्‍यात आले आहेत. या १४ दिवसाच्या कालावधीत आतील व्यक्ती बाहेर व बाहेरील व्यक्ती आत असा कोणालाही प्रवेश नसतो. आत अलगीकरण केलेल्या रहिवाशांसाठी नित्यनेमाच्या किराणा माल जसे की, पीठ, तांदुळ, डाळ, मीठ, मसाला, तेल आदी वस्तू पुरवण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश आहेत. त्यानुसार जी-दक्षिण विभागाच्या अभियंत्यांनी प्रभादेवीतील या क्वारंटाईन केलेल्या चाळीतील रहिवाशांना सर्व किराणा वस्तुंच्या पिशव्या तयार करून कुटुंबनिहाय वाटप करण्याच्यादृष्टीकोनातून इमारती खाली उपलब्ध करून दिल्या. १ एप्रिलच्या दिवशी इमारतीखाली किरणा मालाच्या वस्तू पाहून क्षणभर रहिवाशांना एप्रिल फुलच वाटले होते. परंतु प्रत्येक रहिवाशांना अंतर  ठेवून या वस्तू घरी घेवून जाण्याच्या सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी करताच सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य तरळले आणि इमारतीच्या गॅलरीतून महापालिकेच्या या अधिकाऱ्यांचे टाळ्या वाजवतच त्यांनी आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवस जनता कर्फ्यु लागू करून संध्याकाळी करोनासाठी काम करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, आयाबाई, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, पोलिस आदींसह अत्यावश्यक सेवेतील कामगार,कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यासाठी टाळ्या वाजवण्यास तसेच थाळीनाद करण्याचे आवाहन केले. परंतु दयावीरा सोसायटीतील रहिवाशांनी याचप्रकारे टाळ्या वाजवत आभार मानल्याने महापालिकेचे अधिकारी धन्य झाले आणि मोठ्या समाधानाने तेथून बाहेर पडले व पुन्हा एकदा नव्या उमेदीने हे अधिकारी पुढच्या मोहिमेवर निघाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -