Homeमहाराष्ट्रSudden Baldness : अजब आजाराने बुलढाण्यातील ग्रामस्थ हैराण...आधी डोक्याला येते खाज मग...

Sudden Baldness : अजब आजाराने बुलढाण्यातील ग्रामस्थ हैराण…आधी डोक्याला येते खाज मग पडते टक्कल

Subscribe

एका वेगळ्याच आजाराने बुलढाणा जिल्ह्यातील काही गावांतील गावकरी त्रस्त आहेत. या जिल्ह्यातील काही गावांमधील लोकांचे केस अचानक गळायला सुरुवात झाली. आणि त्यांना टक्कलाची समस्या भेडसावते आहे.

बुलढाणा : चीनमध्ये नव्याने आलेल्या HMPV मुळे सध्या सगळीकडे खळबळ उडाली आहे. भारतातही त्याचे काही रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. मात्र, या सगळ्यापासून एका वेगळ्याच आजाराने बुलढाणा जिल्ह्यातील काही गावांतील गावकरी त्रस्त आहेत. या जिल्ह्यातील काही गावांमधील लोकांचे केस अचानक गळायला सुरुवात झाली. आणि त्यांना टक्कलाची समस्या भेडसावते आहे. (people in many villages of buldhana district complaints of sudden hair loss officials testing water)

हा त्रास एवढा वाढला आहे की, आतापर्यंत येथील जवळपास दोन डझन लोकांचे केस गेले आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये गोंधळ उडाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावांमधील लोक या समस्येला तोंड देत आहेत. अनेकांनी आपले गाऱ्हाणे शासनदरबारी मांडले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी स्थानिक जलस्रोतांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या परिस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

शेगावचे आरोग्य अधिकारी डॉ. दीपाली बहेकर यांनी याबाबत प्रसार माध्यमांना माहिती देताना सांगितले की, हे प्रकरण समोर आल्यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने मंगळवारी गावा – गावात जात सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली. ज्यांना याचा त्रास झाला आहे, त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार शेगाव तालुक्यातील कलवाड, बोंडगाव आणि हिंगणा गावातील 30 पेक्षा अधिक लोकांनी अचानक केस गळण्याची तसेच टक्कल पडण्याची तक्रार केली आहे.

सुरुवातीला लोकांना डोक्यात खाज येण्यास सुरुवात होते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी जवळपास सगळे केस गळतात आणि टक्कल पडते. केवळ पुरुषच नाही तर महिलांना देखील याचा त्रास झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही डॉक्टरांनी यासाठी काही प्रमाणात शॅम्पूचा वापर कारणीभूत असू शकतो, असे म्हटले आहे. मात्र, ज्यांनी कधीही शॅम्पू वापरला नाही त्यांनाही याचा त्रास झाला आहे.

बहेकर यांनी सांगितले की, रुग्णांनी जी लक्षणे सांगितली आहेत, त्याच्या आधारे आरोग्य विभागाने रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्वचा तज्ज्ञांची देखील मदत घेतली जात आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गावांमधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. यामुळे पाणी दूषित झाले आहे का, याची माहिती मिळणार असल्याचेही त्या म्हणाल्या. दरम्यान, सध्या या लक्षणांच्या आधारावर आरोग्य विभाग औषधोपचार करत आहे.

येथील पाण्याला जडत्व आल्याचा अंदाज आहे, त्यामुळे ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागत असावा, असे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पाण्याचे जडत्व म्हणजेच पाण्यातील कॅल्शियम तसेच मॅग्निशिअमचे प्रमाण वाढणे.