घरमहाराष्ट्रअटींवर उद्योग सुरू करण्यास परवानगी

अटींवर उद्योग सुरू करण्यास परवानगी

Subscribe

मात्र जिल्हाबंदी कायम : उद्धव ठाकरे

राज्यात सध्या करोनाचे संकट असून, राज्यात करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र सुदैवाने काही जिल्ह्यात करोनाने शिरकाव केलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी उद्योगधंदे सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह दरम्यान याबाबतची माहिती दिली. करोनाचे रुग्ण आणि प्रादुर्भाव लक्षात घेऊन सरकारने सोमवारपासून काही अटींवर ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यात उद्योग सुरू करण्यास मान्यता दिली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

वृत्तपत्र घरोघरी वितरण करण्यास परवानगी नाही
दरम्यान, सध्या वृत्तपत्र चालू करण्यास जरी राज्य सरकारने परवानगी दिली असली तरी वृत्तपत्र स्टॉलवर उपलब्ध करून देता येतील. परंतु घरोघरी जाऊन वितरित करण्यास परवानगी देता येणार नाही. मुंबई-पुणे वगळून राज्यात याबाबत इतरत्र काय करता येईल यासंदर्भातील निर्णय नंतर घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisement -

आतापर्यंत शेतीविषयक कामे, शेतमालाची वाहतूक, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरूच होती. परंतु अर्थचक्र सुरू करताना ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जे उद्योजक-कारखानदार त्यांच्या कामगारांची काळजी घेतील, त्यांची तिथेच राहण्याची व्यवस्था करतील. त्यांना उद्यापासून काम सुरू करण्यासाठी मुभा देण्यात येईल. त्यासाठी त्यांना आवश्यक असलेला कच्चा माल आणि अन्नधान्य पुरवण्यात येईल. आपल्याला मालवाहतूक सुरू करायची आहे, व्हायरसची वाहतूक करायची नाही. कोणताही धोका स्विकारायचा नाही, असे देखील मुख्यमंत्री म्हणाले. यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने जे आदेश निर्गमित केले आहेत, त्याचे तंतोतंत पालन केले जाईल हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यांच्या सीमा बंदच

- Advertisement -

जिल्ह्यांच्या सीमा आपण उघडलेल्या नाहीत हे अधोरेखित करून मुख्यमंत्री म्हणाले की, एका जिल्ह्यातील माणसे दुसर्‍या जिल्ह्यात जाण्यास अजूनही परवानगी नाही. राज्यातील नागरिकांसाठी हा लॉकडाऊन संपलेला नाही. ३ मे पर्यंत त्यांनी आहे तसेच घरी राहायचे आणि सामाजिक अंतराची शिस्त पाळायची आहे. राज्यात अ‍ॅण्टी करोना पोलीस ही उत्तम सेवा देताना दिसत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अत्याचारग्रस्त महिलांसाठी १०० नंबर
राज्यातील जनतेने आतापर्यंत अतिशय संयम, जिद्द आणि धैर्य दाखवून या संकटाचा सामना केला आहे. त्यांचे मी आभार मानतो असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, खुप काळ घरी राहिल्याने मानसिकस्थिती थोडीफार इकडे तिकडे होते. परंतु याचा अर्थ असा नाही की लॉकडाऊन आहे म्हणून पुरुषांनी घरातील महिलांना त्रास द्यावा. महिलांवर घरात अत्याचार होता कामा नयेत असे सांगून मुख्यमंत्र्यांनी दुर्दैवाने असा अत्याचार होत असल्यास अशा महिलांनी १०० नंबरवर फोन करून पोलिसांना कळवावे, पोलीसरुपातील भाऊ नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील असे सांगितले. तसेच मानसिक अस्वस्थता वाढली असेल, समुपदेशनाची गरज असेल त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज मुंबई महानगरपालिका आणि बिर्ला या संस्थेच्या विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईनचा नंबरही सांगितला. तसेच राज्यातील खाजगी डॉक्टर्सशी आपण तसेच टास्कफोर्सचे डॉक्टरही बोलले असून, त्यांची करोनाविरुद्ध लढायची तसेच दवाखाने उघडण्याची तयारी असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ही रुग्णालये फक्त नॉन कोविड रुग्णांसाठी ज्यांना हृदयरोग, किडनीचे आजार आहेत, मधुमेहासारखे गंभीर आजार आहेत त्यांच्या उपचारासाठी आहेत. सर्दी, ताप आणि खोकल्याच्या रुग्णांनी या दवाखान्यात जाऊ नये, सरकारी दवाखान्यात येऊन तपासणी करावी, असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -