‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ धोरणास पेट्रोल डिलर्स असोसिएशनचा विरोध

अत्यावश्यक सेवा कायद्यान्वये सेवा नाकारणे अशक्य

Helmet

शहरात १ ऑगस्टपासून हेल्मेट सक्तीची मोहिम राबवितांना हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही असे धोरणाची अंमलबजवणी करण्याचे सुतोवाच पोलीस आयुक्तांनी केले. मात्र या धोरणास नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स वेल्फेअर असोसिएशनने विरोध दर्शवला आहे. या निर्णयामुळे पेट्रोल पंप चालक आणि ग्राहकांमध्ये वाद निर्माण होऊ शकतात. तसेच ग्राहक संरक्षण कायदा तसेच अत्यावश्यक वस्तू व सेवा अधिनियमान्वये पंपचालकांना इंधन नाकारण्याचा अधिकार नाही त्यामुळे अशा प्रकारे एकतर्फी निर्णय घेऊ नये अशी मागणी असोसिएशनच्यावतीने पालकमंत्र्यांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, हेल्मेट सक्तीस असोसिएशनचा विरोध नाही परंतु पंप चालकांशी याबाबत कोणतीही चर्चा न करता हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी देखील २०१६मध्ये अशा प्रकारचे धोरण आखण्यात आले होते मात्र या निर्णयाला विरोध झाला. सध्या इंधनाचे दर वाढल्याने सर्व आर्थिक गणित कोलमडले आहे. डिलरला अप्रत्यक्ष कराचे संकलन करणे आणि ग्राहकाला सेवा देणे ही मुख्य जबाबदारी आहे. तसेच ग्राहक संरक्षण कायद्यानूसार ग्राहकांना सेवा नाकारणे शक्य नाही. पेट्रोल न मिळाल्यास ग्राहकाकडून वाद निर्माण झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. पेट्रोल पंप संवेदनशील जागा असल्याने अशा ठिकाणी अनुचित घटना घडणे उचित नाही. त्यामुळे असा निर्णय घेताना पेट्रोल पंपावर पुरेसा पोलीस बंदोबस्त देऊन या निर्णयाची पोलीसांमार्फत अंमलबजावणी करण्याची मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे.