फोन टॅपिंग प्रकरण : मुंबई सायबर पोलिसांकडून सीबीआयचे संचालक सुबोध जैस्वाल यांना समन्स

phone tapping case mumbai police summons cbi director subodh jaiswal
फोन टॅपिंग प्रकरण : मुंबई सायबर पोलिसांकडून सीबीआयचे संचालक सुबोध जयस्वाल यांना समन्स

केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) प्रमुख सुबोध जैस्वाल यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून फोन टॅपिंग प्रकरणात समन्स पाठवण्यात आले आहेत. जैस्वाल यांना १४ ऑक्टोबर रोजी मुंबई सायबर गुन्हे शाखेत उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई सायबर गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला असून आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना देखील यापूर्वी सायबर सेलने समन्स जारी केले होते.

सुबोध जैस्वाल हे केंद्रीय अन्वेषण विभागाचे प्रमुख असून जेष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलीस आयुक्त तसेच राज्याचे पोलीस महासंचालक पद भूषवल्यानंतर जैस्वाल हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले होते. सुबोध जैस्वाल हे राज्याचे पोलीस महासंचालक असताना अधिकाऱ्यांच्या बदल्यांप्रकरणात राज्य गुप्तचर विभागाकडून फोन टॅपिंग करण्यात आले होते. या फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलीसांच्या सायबर गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एसआयडीच्या प्रमुख रश्मी शुक्ला असताना हे फोन टॅपिंगचा प्रकार झाल्याचे समोर आले होते. हे फोन टॅपिंग बेकायदेशीररित्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर सायबर गुन्हे शाखेत गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेने तत्कालीन जेष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना देखील चौकशीसाठी समन्स जारी केले होते.

जैस्वाल हे राज्याचे पोलीस महासंचालक असताना फोन टॅपिंग प्रकरण घडल्यामुळे या फोन टॅपिंग प्रकरणी राज्याचे पोलीस महासंचालकी यांना याबाबत काही माहिती होती का ? एसआयडी (राज्य गुप्तचर विभाग) यांच्याकडून पोलीस महासंचालक कार्यालयाला कळविण्यात आले होते का ? याबाबत माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने शनिवारी सुबोध जैस्वाल यांना ई – मेल च्या माध्यमातून समन्स पाठवण्यात आले असून १४ ऑक्टोबर रोजी सायबर गुन्हे शाखा वांद्रे कुर्ला संकुल येथे हजर राहण्यास सांगितले आहे. जैस्वाल यांना समन्स पाठवण्यात आले असल्याबाबत मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून दुजोरा देण्यात आला आहे.


हेही वाचा : NCB ने राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाच्या जवळच्या व्यक्तीलाही सोडलं, फडणवीसांची नवाब मलिकांच्या आरोपावर प्रतिक्रिया