नाशिक : फुले-शाहू-आंबेडकर यांना पुजलेच पाहिजे. मात्र यात माता सरस्वतीचा अवमान करणे बरोबर नाही. भारत देश हा हिंदू दैवताना मान्य करणारा असून कुणाच्या भावनांना ठेच लागेल असे बोलू नये, असा सल्ला पालकमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे. मविप्र समाजदिनाच्या कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांनी सरस्वती पूजनावर केलेल्या अप्रत्यक्ष वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मविप्र समाजदिन कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांनी आपण ज्यांचे फोटो लावतो, त्यांनी किती शाळा केल्या, त्यांनी सर्वांना का नाही शिकवले? आपण आपले देव ओळखायला शिका, असा प्रश्न उपस्थित केला. यानंतर पालकमंत्री भुसे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले आहे. भुसे म्हणाले की, फुले-शाहू-आंबेडकर यांना पुजलेच पाहिजे. मात्र यात माता सरस्वतीचा अवमान करणे बरोबर नाही. विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवर यांनी सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री पदाची खुर्ची बदलणार असल्याचे विधान केले.
यावर भुसे म्हणाले की, स्वप्न पाहण्याचा सर्वांना अधिकार असून शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकारवर जनता खुश आहे. मात्र जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी असे वक्तव्य केले जात असल्याचे सांगत त्यांच्या मुख्य खुर्चीत बदल होऊ शकतो का? असा प्रश्न भुसे यांनी उपस्थित केला. तर सामनाच्या अग्रलेखावर ते म्हणाले की, सामनातून रोज कोणा कोणाला वैयक्तिक पातळीवर खालच्या स्तरावर टीका केली जात आहे. देशात प्रत्येकाला मत मांडण्याचे अधिकार आहे, मात्र त्याचा वापर कसा केला पाहिजे, याचे चिंतन त्यांनी केले पाहिजे, असा सूचक सल्लाही भुसे यांनी दिला आहे.
भुजबळ काय म्हणाले वाचा : ब्राम्हण समाजात शिवाजी, संभाजी नावे नसतात; भिडेंवर टीका करताना छगन भुजबळ असे का म्हणाले?