घरमहाराष्ट्रनाशिकपितृपक्षात गुंतवणुकीची ‘सुवर्ण’संधी!

पितृपक्षात गुंतवणुकीची ‘सुवर्ण’संधी!

Subscribe

सोन्याची चमक फिकी, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण

आजपासून सुरू होणार्‍या पितृपक्ष पंधरवड्याबाबत आपल्याकडे अनेक धारणा आणि समजुती आहेत. यातील एक प्रमुख समज म्हणजे पितृपक्ष पंधरवड्याचा काळ अशुभ मानला जातो. त्यामुळे या कालावधीत नवीन गोष्टींची खरेदी करू नये, असे सांगितले जाते. यामुळे या कालावधीत अनेक उद्योग, व्यापारांची गती एकदम मंदावते. परंतु, विशेष म्हणजे, या काळात सोने खरेदीला गुंतवणूकदारांकडून पसंती दर्शवली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यातच गत आठवड्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने गुंतवणूकदारांसाठी सोने खरेदीची ही सुवर्णसंधी मानली जात आहे. एकंदरीतच या पितृपक्ष कालावधीलाच संधी मानून अनेक जण ‘सुवर्णखरेदी’साठी पुढे येत असल्याचेही आता पुढे येत आहे.

आयुष्यात शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात. त्यासाठी पै-पै कोठे, कसा, कधी गुंतवायचा याचा विचार होतो. यात सोन्यातील गुंतवणुकीकडे शाश्वत गुंतवणूक म्हणून बघितले जाऊ लागले आहे. सोने-चांदीतील गुंतवणूक ही त्वरित रोकड सुलभता देणारी असून हौसे म्हणून बघण्यापेक्षा अडचणीच्या काळात सुलभ परतावा देणार्‍या गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून आता सोन्याकडे बघितले जाते. सोन्याएवढी रोकड सुलभता कोणत्याही गुंतवणूक प्रकारात नसल्याचे दिसून आले आहे. कोविडसारख्या जागतिक महामारीच्या काळात सोन्याचे दर गगनाला भिडले होते. परंतु कोरोना लसनिर्मिती प्रक्रिया सुरू होताच सोने-चांदीच्या दरात घसरण बघायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून साने-चांदीच्या दरात घसरण बघायला मिळत आहे. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅममागे ४६४००, तर चांदीचे दर किलोमागे ६३००० रुपये नोंदवले गेले. सोन्याच्या दरावर तीन टक्के जीएसटी लागू असेल. पुढील काही दिवस हे दर स्थिर राहण्याची शक्यता सराफ व्यावसायिकांनी वर्तवली आहे. मंगळवारपासून पितृतपंधरवडा सुरू आहे. या काळात सोने खरेदी अनिष्ट मानली जाते. मात्र, अनेक गुंतवणूकदार याच काळात सोने खरेदीला प्राधान्य देत असल्याचा ट्रेंड दिसून येत आहे. या काळात प्रत्यक्षात सोने खरेदी जरी केली जात नसली तरी, पुढील दसर्‍याच्या पार्श्वभूमीवर याच काळात दागिने घडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऑर्डर येत असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. त्यामुळे सोन्याची चमक जरी फिकी झाली असली, तरी हा काळ गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधीच मानला जात आहे.

- Advertisement -

दुप्पट होऊ शकतो सोन्याचा दर

पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा, असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तवला आहे. पुढच्या ३ ते ५ वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या ५ वर्षांत १० ग्रॅम सोन्याचा दर ९० हजारांवर जाऊन पोहोचेल, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ञांनी वर्तविला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असेही काही जाणकारांचे मत आहे.

- Advertisement -

दर घसरणीची ही आहेत कारणे

* अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत झालेली सुधारणा
* कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची मावळलेली शक्यता
* शेअर मार्केटमध्ये होत असलेली वाढ

वर्षभरात १०,४०० ने दर कमी

ऑगस्ट २०२० ते ऑगस्ट २०२१ या वर्षभरात सोन्याच्या दरात २५ टक्क्यांनी घट झाली आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर १० ग्रॅममागे ५६,२०० रू. होते यंदा ते ४५,८०० पर्यंत म्हणजेच १० हजार ४०० रुपयांनी खाली आले आहेत.

 

पितृपक्षात सोन्याचे दर कमी होतात हा समज चुकीचा आहे. सोन्याचे दर जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असतात. योगायोगाने यंदा दरात घसरण होत आहे. त्यामुळे गुंतवणुकीला चांगली संधी आहे.
चेतन राजापूरकर, माजी अध्यक्ष, सराफ असोसिएशन

पितृपक्ष जरी सुरू होत असला तरी, पुढे येणर्‍या दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर अनेकजण आतापासूनच सोने खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर बुकिंग करतात. त्यातच आता दर कमी होत असल्याने गुंतवणुकीकडे कल वाढेल असे चित्र आहे. – गिरीश नवसे, अध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन

Manish Katariahttps://www.mymahanagar.com/author/kmanish/
गेल्या १७ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, प्रशासकीय मुद्यांवर वृत्तांकन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -