सुप्रिया सुळे म्हणतात कांद्याची निर्यात बंदी उठवा; गोयल म्हणतात दिशाभूल करू नका

कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नाही. दिशाभूल करणारी वक्तव्ये करु नका. अशा प्रकारे चुकीची वक्तव्ये करणे खेदजनक आहे. जुलै ते डिसेंबर २०२२ या काळात कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात झाली आहे. ४० मिलियन अमेरिकन डॉलरची निर्यात दर महिन्याला होत आहे. अन्नदाताला लाभ होत आहे, असे ट्वीट गोयल यांनी केले आहे. 

piyush-goyal

नवी दिल्लीः कांद्याची निर्यात बंदी उठवा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करून मोदी सरकारकडे केली होती. या मागणीला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. लोकांची दिशाभूल करू नका. केंद्र सरकारने अशी कोणतीही बंदी घातलेली नाही, असे उत्तर मंत्री गोयल यांनी दिले आहे.

कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नाही. दिशाभूल करणारी वक्तव्ये करु नका. अशा प्रकारे चुकीची वक्तव्ये करणे खेदजनक आहे. जुलै ते डिसेंबर २०२२ या काळात कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात झाली आहे. ४० मिलियन अमेरिकन डॉलरची निर्यात दर महिन्याला होत आहे. अन्नदात्याला लाभ होत आहे, असे ट्वीट गोयल यांनी केले आहे.

केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी खासदार सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. कांद्याचे बाजारभाव कोसळले आहेत. कवडीमोल भावाने कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. काहीजणांनी तर कांदा उघड्यावर फेकून दिला आहे. तर दुसरीकडे जगभरात कांदाटंचाई आहे. तेथे मागणी असूनही कांदा निर्यातबंदीमुळे तो जागतिक बाजारपेठेत पाठविता येत नाही. भारतीय शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, असे खासदार सुळे यांनी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणले होते.

ही परिस्थिती डोळ्यांदेखत सुरू असताना केंद्रीय कृषी आणि वाणिज्य मंत्रालय काय करत आहे? असा सवालही खासदार सुळे यांनी केला होता.  दोन्ही मंत्र्यांनी ही स्थिती पाहून तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. परंतु याबाबत कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत, ही मोठी खेदाची बाब आहे. देशातील जादा कांदा, जागतिक बाजारपेठेत पाठविल्यास त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना मिळेल. शेतकऱ्यांना चार पैसे मिळावे अशी सरकारची इच्छा असेल तर याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक विचार करुन तातडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे, असेही खासदार सुळे यांनी नमूद केले होते. या मागणीचे खासदार सुळे यांनी ट्वीटही केले होते. खासदार सुळे यांच्या ट्वीटला केंद्रीय मंत्री गोयल यांनी ट्वीट करून उत्तर दिले.