घरताज्या घडामोडी'दुसरे शिवाजी महाराज होणे नाही'; राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजपवर टीका

‘दुसरे शिवाजी महाराज होणे नाही’; राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजपवर टीका

Subscribe

महाराष्ट्राला प्रेरणा देणारे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या पुस्तकाचे लेखन भाजप नेते जय भगवान गोयल यांनी केले आहे. तसेच भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात पुस्तकाचे अनावरण देखील करण्यात आले आहे. यावरुन एकच गदारोळ उडाला असतानाच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता भाजपला धारेवर धरून याबाबत प्रश्न विचारला आहे. “जगाच्या अंतापर्यंत दुसरे शिवाजी होणे शक्य नाही”, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. तर “हा अट्टाहास करु पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही”, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील ट्विट करुन आपली नाराजी व्यक्त केली आहे.

आज जिजाऊ जयंतीच्या दिवशी दिल्लीत भाजपच्या कार्यालयात ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकावर आता सर्व स्तरातून टीका होत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सर्वात आधी ट्विट करत यावर आक्षेप नोंदवला. “जगाच्या अंतापर्यंत दुसरे छत्रपती शिवाजी महाराज होणे नाही, ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’, हे पटत नाही मनाला” असे म्हटले आहे.

- Advertisement -

सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील ट्विटरवरुन भाजपला टोला लगावला आहे. “हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान मोदींची थेट तुलना करणारे पुस्तक प्रकाशित करून भाजपच्या नेत्यांनी मराठी जनाच्या भावना दुखावल्या आहेत. युगपुरुष छत्रपती शिवरायांची बरोबरी कोणीही करू शकत नाही, हा अट्टहास करू पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही.” असे मुंडे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील भाजपला धारेवर धरले आहे. “नेत्यांच्या गुडबुक मध्ये रहायचं असेल तर त्यासाठी अन्य पर्याय देखील उपस्थित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय तर अन्य कोणत्याही व्यक्तींसोबत तुलना करणे कधीच पटणार नाही. या विषयावर राज्यातील भाजप नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे” असे आव्हानच रोहित पवार यांनी दिले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -