सोलापूर दौरा; मोदींनी फुंकले लोकसभेचं रणशिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बहुचर्चित सोलापूर दौऱ्यामध्ये पंतप्रधानांनी थेट काँग्रेसला लक्ष्य करत जोरदार टीकास्त्र डागलं. जवळपास अर्धातास चाललेल्या भाषणाची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून केली.

Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बहुचर्चित सोलापूर दौऱ्यामध्ये पंतप्रधानांनी थेट काँग्रेसला लक्ष्य करत जोरदार टीकास्त्र डागलं. जवळपास अर्धा तास चाललेल्या भाषणाची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून केली. भाषणाला सुरूवात करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद हायवेचं उद्घाटन केलं. यावेळी सबका साथ सबका विकास असा नारा देत, राफेल करार, ऑगस्टा वेस्टलँड डील, पंतप्रधान आवास योजनेचा हवाला देत थेट काँग्रेसला लक्ष्य केलं. एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा रोख पाहता सोलापूरच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा २०१९च्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले. पंतप्रधानपदी आल्यानंतर नरेंद्र मोदी तिसऱ्या वेळी सोलापूरच्या दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी हजारो कोटींच्या कामांचा शुभारंभ देखील केला. भाषणादरम्यान उपस्थितांनी मोदी – मोदीचा नारा दिला.

मिशेल मामाशी नातं काय? मोदींचा काँग्रेसला सवाल

भाषणादरम्यान नरेंद्र मोदी यांनी राफेल करारावरून काँग्रेसला लक्ष्य केलं. मीडिया रिपोर्टनुसार राफेल करारामध्ये देखील मिशेलनं लॉबिंग केली. काँग्रेस मिशेल कनेक्शनवर उत्तर देणार का? मिशेल मामाशी नातं काय? यावर काँग्रेस काय उत्तर देणार? असे एक ना अनेक सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला केले. शिवाय, आता दलालांना मलाई खाता येत नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. संकुचित विचाारांमुळे देशाचा विकास खुंटला अशी टीका देखील नरेंद्र मोदी यांनी केली.

रिमोट कंट्रोलवरचं सरकार

२००४ ते २०१४ या काळातील सरकार हे रिमोट कंट्रोलवर चालणारं होतं अशी टीका यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. २००४ ते २०१४ मध्ये १३ लाख घरं केवळ कागदावर बांधली गेली. पण आम्ही सत्तेवर आल्यानंतर एका वर्षात ८० हजार घरं बांधल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. काँग्रेसनं १० वर्षात ८ लाख घरं बांधली. पण, भाजप सरकारनं ४ वर्षात ७० लाख घरं बांधल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. तसेच अटल पेन्शन योजनेचे सव्वा लाख गरिबांना फायदा झाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

घरांची चावी आम्हीच देणार!! 

दरम्यान, ३० हजार घरांची चावी देण्यासाठी आम्हीच येणार असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फिर मोदी’चा नारा दिला आहे. सोलापूर दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पंतप्रधान आवास योजनेतंर्गत ३० हजार घरांसाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.

दिखाव्यासाठी काम करत नाही

आम्ही केवळ दिखाव्यासाठी काम करत नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. दरम्यान, आमच्या काळात झालेल्या विकासकामांचं उद्घाटन आम्हीच करणार म्हणत अप्रत्यक्ष का असेना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.