नवी मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यात प्रचार सभा घेत आहेत. गुरुवारी (14 नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पनवेलमध्ये घेतलेल्या प्रचार सभेत काँग्रेसवर निशाणा साधला. “गरिबांच्या कल्याणासाठी जाहीर केलेल्या योजनांना काँग्रेस विरोध करते. देशातील गरिबांचे चांगले झालेले, काँग्रेसवाल्यांना बघवत नाही,” अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली. पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीमधील भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी ते बोलत होते. (PM Modi election rally in panvel criticized congress)
हेही वाचा : Politics : आधी समर्थन नाही आणि आता युटर्न; बटेंगे तो कटेंगेच्या घोषणेप्रकरणी काय म्हणाल्या पंकजा मुंडें?
महायुती स्वराज्याचा संकल्प पूर्ण करतेय
“विकसित भारताचे नेतृत्व महाराष्ट्र करणार आहे. भाजपसह महायुतीचे हे सरकार याच उद्देशाने काम करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्याची शपथ दिली होती. विकसित भारत घडवण्याची तसेच स्वराज्यापासून सुराज्याची संकल्पना आपण पुढे घेऊन जायला हवे. महायुतीचे आपले सरकार हे स्वराज्याचा संकल्प पूर्ण करत आहे.” असे म्हणत त्यांनी महायुती सरकारने आणि केंद्र सरकारने राज्यात केलेल्या कामाचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला.
काँग्रेस गरिबांच्या विरोधात
“गरीब हे गरीबच राहिले पाहिजेत, असा काँग्रेसचा नेहमीच अजेंडा राहिला आहे. पिढ्यानपिढ्या हे लोक गरिबी हटावच्या खोट्या घोषणा देत राहिले. गरिबी हटावच्या घोषणेच्या नावाखाली काँग्रेसने गरिबांची लूट केली. म्हणूनच माझे गरीब सहकारी दैनंदिन जीवनातील अडचणींमधून बाहेर येऊ शकले नाहीत. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही देशातील बहुसंख्य जनता अन्न, वस्त्र आणि निवारा मिळविण्यासाठी संघर्ष करत आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये पहिल्यादाच याबाबतची परिस्थिती बदलली आहे. पहिल्यांदाच आपल्या सरकारने 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे.” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
“महायुती सरकारची धोरणे आज शोषित-वंचितांची ताकद बनत आहेत. जे काम 10 वर्षांत झाले ते आधीही करता आले असते. पण गरिबांनी पुढे येऊन आपले हक्क मागावेत, हे काँग्रेसला पटणारे नव्हते. त्यामुळेच आजही काँग्रेस गरिबांसाठीच्या प्रत्येक कल्याणकारी योजनेला कडाडून विरोध करत असते. काँग्रेस म्हणते, गरिबीतून बाहेर आलेल्या 25 कोटी लोकांना मोफत रेशन का मिळत आहे? या लोकांचा खर्च वाढून ते पुन्हा गरिबीत जावेत, अशी काँग्रेसची इच्छा आहे. आघाडीला संधी मिळाली तर महाराष्ट्रातही तेच करतील.” असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.