मुंबई : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नव्हती. पण, काँग्रेसने ते लोकांना इतके वर्ष शिकवले, असा दावा केला होता. यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 10 वर्षांपूर्वीचे एक भाषण चांगलेच वायरल झाले आहे. संभाजी भिडेंनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी याबद्दल एक विधान केले होते. (PM Modi on Surat and Chhatrapati Shivaji Maharaj history 2014 speech)
हेही वाचा : Thane Crime : भाजपा आमदाराशी संबंधित अंबरनाथमधील जागेवरून पुन्हा वाद
5 जानेवारी 2014 च्यानिमित्ताने धारातीर्थ यात्रेच्यानिमित्ताने नरेंद्र मोदी हे रायगड किल्ल्यावर गेले होते. यावेळी त्यांनी भाषण करताना, शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नव्हती. पण, ‘महाराजांनी सूरत लुटली,’ असा शब्दप्रयोग करून काही इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्याचा आरोप केला होता. तसेच ते पुढे म्हणाले होते की, ‘सूरतमध्ये औरंगजेबचा खजिना होता आणि महाराजांनी तो ताब्यात घेतला होता. या कामामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना सूरतमधील स्थानिक लोकांची मदत मिळाली होती,’ असे आपल्या भाषणात स्पष्ट केले होते. तसेच, या भाषणामध्ये ते म्हणाले होते की, ‘सूरत लुटली हा शब्दप्रयोग म्हणजे शिवाजी महाराजांना घोर अपमान आहे. ही विकृत इतिहासकारांचं देणं आहे. या अशा शब्दांमुळेच ज्या इतिहासाचा स्वाभिमान आणि गौरव व्हायला हवा, त्याबद्दल काही ना काही शंका उपस्थित केली जाते.” असे म्हणत त्यांनी आपले मत मांडले होते.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
राज्यात एकीकडे मालवण घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केले. ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज यांनी सूरत लुटलेच नाही. याउलट सूरतच्या लोकांनी तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आहे. तरीही काँग्रेसने शिकवण दिली आहे, की छत्रपती शिवरायांनी सूरत लुटली. याची माफी काँग्रेस मागणार का?” असा सवाल त्यांनी यावेळी केला होता. पण या विधानावर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.