घरलोकसभा २०१९खडाजंगी'पवार, पाणी, पुलवामा आणि ऊस'...प्रचारातील 'पॉवरगेम'

‘पवार, पाणी, पुलवामा आणि ऊस’…प्रचारातील ‘पॉवरगेम’

Subscribe

आज अकलूज येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर टीका केली. यावेळी त्यांच्या भाषणात पाणी आणि ऊस हे मुद्दे देखील होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सोलापूरातील अकलूज येथे पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा संपन्न झाली. नरेंद्र मोदींची ही राज्यातील पाचवी सभा आहे. आधीच्या सभेप्रमाणे याही सभेत मोदींनी शरद पवार यांच्यावर शरसंधान साधले. शरद पवारांनी ऊस उत्पादकांचे नुकसान केले, माढा-सोलापूरला पाणी दिले नाही, असे अनेक मुद्दे उपस्थित केले. “मोदींचे कुटुंब नसल्यामुळे ते इतरांच्या कुटुंबावर टीका करतात”, असे वक्तव्य पवारांनी केले होते. यावरही मोदींनी या सभेत पलटवार केला आहे. त्यासोबतच प्रत्येक सभेत मोदी सैनिकांच्या पराक्रमाचा उल्लेख करत आहेत. या सभेत देखील त्यांनी पुलवामा हल्ल्याचा उल्लेख करत काँग्रेसवर टीका केली.

पवार –

“शरद पवार हे मोठे खेळाडू आहेत. ते वेळेआधीच हवेचा अंदाज घेतात. दुसऱ्याचा बळी गेला तरी चालेल ते कधीच स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबियांचे नुकसान होईल, असे काम करत नाहीत. अकलूजमध्ये आजच्या सभेला हे भगवे वादळ जमले आहे, त्यावरून मी सांगू शकतो की याला घाबरूनच त्यांनी माढातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला”, अशी टीका मोदींनी पवारांवर केली.

- Advertisement -

शरद पवारांनी माझ्या कुटुंबियांवर हल्ला करायला सुरुवात केली आहे. माझे कुटुंब नसल्याचे ते सांगतात मात्र मी सांगू इच्छितो की, कुटुंबव्यवस्था ही भारताची ताकद असून ती आपणच जगाला दिलेली देण आहे. कुटुंबावरून ते माझ्यावर वाईट बोलू शकतात. ते वयाने मोठे आहेत. पण मोदी आज जे जीवन जगत आहे, त्याची प्रेरणा परिवारातूनच घेतलेली आहे. शहीद राजगुरु, चाफेकर बंधू, महात्मा फुले, सरदार वल्लभभाई पटेल, वीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबाकडून मी प्रेरणा घेतलेली आहे. एवढंच काय तर शरद पवारांचे गुरु स्व. यशवंतराव चव्हाण यांच्याही कुटुंबाकडून मी प्रेरणा घेतलेली आहे. मात्र शरद पवार तुम्ही फक्त दिल्लीतील एका परिवाराची सेवा करण्यात गुंतला आहात. शरद पवार तुम्हाला माझ्याएवढा त्याग करायला जमणार नाही, तुम्हाला ते शक्य नाही, असेही मोदी म्हणाले.

पाणी –

२३ मे रोजी नवीन सरकार सत्तेवर आरूढ होईल, त्यानंतर सरकारतर्फे जल शक्ती मंत्रालय स्थापन केले जाईल. एक मंत्री पुर्णवेळ पाण्यावर लक्ष केंद्रीत केले जाईल. देशातील विविध नद्यांचे पाणी कोरड्या राहिलेल्या क्षेत्रात कसे वळविता येईल? यावर काम केले जाईल.

- Advertisement -

माढामध्ये दुष्काळ आहे, त्यामुळे हे मंत्रालय माढासाठी वरदान ठरेल. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना देखील पाण्याच्या प्रश्न माझ्यासमोर होता. आम्ही नर्मदा नदीतून पाणी उचलून ४०० किमी लांब असलेल्या कच्छच्या वाळवंटात पाणी पोहचवले. आज कच्छच्या वाळवंटातील शेतकरी आंबे पिकवून परदेशात निर्यात करत आहेत. मी गुजरातमध्ये करु शकलो. पण या राज्यात एवढे दिग्गज मुख्यमंत्री झाले, पण ते पाणी पोहोचवू शकले नाहीत. पाणी हे राजकीय अस्त्र बनले नाही पाहीजे.

पुलवामा – 

आधीच्या सभेप्रमाणे मोदींनी या सभेत देखील पुलवामा हल्ला आणि राष्ट्रवादाचा मुद्दा उपस्थित केला. “जेव्हा सरकार मजबूत असते तेव्हा नेत्यांचे तोंड नाही तर सैनिकांची बंदूक चालते, असे वक्तव्य २०१४ साली केले असल्याचे मोदी म्हणाले. मात्र त्यावेळी पवारांनी माझी हेटाळणी केली होती. पण सरकार आल्यानंतर मी दाखवून दिले आहे की आपल्या शत्रूवर हल्ला कसा करायचा. मुंबईत जेव्हा हल्ला झाला होता. तेव्हा सरकार शांत बसले होते. मात्र यावेळी हल्ला झाल्यानंतर आम्ही घरात घुसून मारले. मात्र तरिही काही लोक सैनिकांच्या पराक्रमावर शंका घेत आहेत.

ऊस –

पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादकांची संख्या खूप मोठी आहे. राष्ट्रवाद आणि पवारांवर टीका करण्यासोबतच मोदींनी ऊस उत्पादकांच्या प्रश्नांलाही हात घातला. ते म्हणाले की, “देशातील पाच कोटी ऊस उत्पादकांसाठी आम्ही योजना आणत आहोत. साखर आयातीवर आम्ही कर वाढवला आहे. तर निर्यातीवरील बंधने हटवले आहेत. ऊस उत्पादकांना सरकारकडून देण्यात येणारी प्रति क्विंटल मदत थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुर्वी हे पैसे साखर सम्राटांच्या हातात दिले जात होते, शेतकरी मात्र तसाच राहत होता.

“ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यासाठी दूरगामी पावले उचलले आहेत.
ऊसापासून इथेनॉल, बायोफ्यूअल बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सराकरकडून पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण केले जाणार आहे. इथेनॉलचे तंत्रज्ञान पुर्वीपासून अस्तित्वात होते, मात्र शरद पवारांना आपली साखरेची दुकाने चालवायची असल्यामुळे त्यांनी याकडे जाणूनबुजून लक्ष घातले नाही.”, अशी टीका मोदींनी यावेळी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -