नवाब मलिकांना न्यायालयाचा दिलासा, खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी परवानगी

PMLA court allows Nawab Malik to get treated at a private hospital
नवाब मलिकांना न्यायालयाचा दिलासा, खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी परवानगी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. नवाब मलिकांनी खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने मलिकांना तुर्तास दिलासा दिला असून त्यांना उपचारासाठी परवानगी दिली आहे. नवाब मलिक ईडी कोठडीमध्ये आहेत. मलिकांना जेजे रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले होते. परंतु त्यांना ज्या व्याधी आहेत त्यावर जेजे रुग्णालयात उपचार होऊ शकत नाही अशी माहिती नवाब मलिकांनी दिली होती.

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांना अटक करण्यात आले आहे. ते सध्या ईडी कोठडीत आहे. तब्येत ढासळल्यामुळे त्यांना जेलमधून स्ट्रेचरवरुन जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेजे रुग्णालयात उपचार अपुरे पडत आहेत. नवाब मलिकांना जे आजार आहेत त्यावर जेजे रुग्णालयात उपचार होऊ शकत नाहीत. यामुळे खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी नवाब मलिकांनी कोर्टात केली होती.

नवाब मलिकांच्या मागणीवर कोर्टाने दिलासादायक निर्णय दिला आहे. नवाब मलिकांच्या आजारावर खासगी रुग्णालयात उपचार केले पाहिजेत असे पत्र रुग्णालयाकडून कोर्टात देण्यात आले होते. यामुळे कोर्टाने नवाब मलिकांना परवानगी दिली आहे. मलिकांसोबत घरातील एका व्यक्तीला राहण्याची परवानगी दिली आहे. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी हे आदेश दिले आहेत.

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे काय होणार?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख न्यायालयीन कोठडीमध्ये असून त्यांचीसुद्धा तब्येत बिघडली आहे. अनिल देशमुखांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान खासगी रुग्णालयात उपचार करण्याच्या परवानगीसाठी अनिल देशमुखांनी याचिका केली आहे. तसेच घरगुती जेवण देण्याची परवानगी मागण्यात आली आहे. या याचिकेवर आज कोर्टात सुनावणी होणार आहे. देशमुखांना न्यायालयाचा दिलासा मिळणार का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.


हेही वाचा : प्रवीण दरेकरांना पोलिसांची नोटीस, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश