शहरातील नागरिकांच्या पोटात विषारी दूध ?

अधिक दुधासाठी ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा वापर

milk

मुरबाड । जनावरांच्या क्षमतेपेक्षा अधिक दूध मिळविण्याच्या लालसेपोटी बहुतांश दूध उत्पादक आपल्या दुधाळ गाई-म्हशींना सरकारी निर्बंध असतानाही सर्रास ऑक्सिटोसीन इंजेक्शन देत असल्याचे उघड होत आहे. ज्या जनावरांना हे इंजेक्शन दिले जाते त्यांना तर त्रास होतोच पण त्यांचे दूध पिणार्‍या माणसांवरही त्याचे दुष्परिणाम होतात. परंतु या गंभीर बाबींवर अन्न आणि औषध प्रशासन पुरेशी कारवाई करत नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शेतीव्यवसायासोबत शेतकरीवर्ग जोडधंदा म्हणून गाय, म्हशी पालन करतात. सध्याच्या घडीला पाळीव घरगुती गाई काही मोजक्याच शेतकर्‍यांकडे उपलब्ध आहेत. या गायींचे दूध शेतकरी सहसा विक्रीसाठी पाठवत नाहीत.ते दूध घरातील लहान मुलांसाठी वापरात आणतात. तर जर्सी किंवा गीरगाय, म्हैस यांच्या दुधाचा धंदा केला जातो. दुग्ध व्यावसायीकांकडून म्हशीच्या (पारडू ) पिल्लांना आईचं दूध पुरेसं पुरवलं जात नाही. त्यामुळे पारडं थोड्याच दिवसात दगावतात.

अशा पारडू नसलेल्या म्हशीला पान्हा येण्यासाठी आणि सोबत दूध वाढीव द्यावे म्हणून दुधाळ जनावरांना दूध काढण्याअगोदर 5 मिनिटे आधी जनावराला ऑक्सिटोसिन औषधांचे इंजेक्शन मारले जाते. हे इंजेक्शन दिल्यामुळे जनावरांवराना लगेच दूध येते, ते क्षमतेपेक्षा जास्त येते. असे इंजेक्शन दिलेल्या जनावराचे दूध पिण्यासा़ठी योग्य नसते. तसेच ऑक्सिटोसीन इंजेक्शन दिलेल्या जनावरांची हाडे ठिसूळ होतात. कालातरांने अशी जनावरे खंगून मरतात.

हे इंजेक्शन शासकिय वैद्यकिय अ़धिकारी किंवा खाजगी तज्ज्ञ (एमबीबीएस) असे तज्ज्ञ डॉक्टरच या औषधाचा वापर करू शकतात, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीधर बनसोडे यांनी सांगितले. तसेच हे इंजेक्शन डॉक्टरांच्या लेखी परवानगीशिवाय दिले जात नाही. या औषधांचा वापर गरोदरवस्थेत इंजेक्शनमधून गरोदर महिलेसाठी उपचारार्थ केला जातो. तेव्हा रुग्णाची शारिरीक क्षमता तपासाण्यात येऊनच औषध दिले जाते. मानवी व्यक्ती आणि जनावरे यांच्यासाठी या औषधात फरक असतो. मादी जनावरे गाभण असताना पशूवैद्यकीय अधिकारी अशी औषधे जनावराला देऊ शकतात. मात्र केवळ दूध जास्त मिळावे म्हणून या औषधाचा गैरवापर होण्याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. ऑक्सिटोसिन या रसायनाचा प्राण्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. गाई-म्हशींवर ऑक्सिटोसिन इंजेक्शन बेकायदा वापरणे हा कायदेशीर गुन्हा आहे.

हे दुध पिल्यास अशक्तपणा येणे, दृष्टीविकार, पोटाचे आजार, गरोदर महिलांनी पिल्यास नवजात बालकास काविळ होणे, श्वसनाचे विकार वाढतात. मुला मुलींत वयापरत्वे बदल जाणवतात, महिलेचा अनैसर्गिक गर्भपात होणे , ऑक्सिटोसीन औषध हार्मोन्स आहे.त्याचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नवविवाहिता किंवा महिलेची प्रसुती सुरळीत पार पाडण्यासा़ठीच वापर केला जातो. हे औषध मेडिकल स्टोरमधून डॉक्टराच्या अधिकृत पत्राशिवाय हे औषध मिळत नाही.
– डॉ,जितेंद्र बेंढारी,स्त्री रोग तज्ज्ञ

ऑक्सिटोसीन इंजेक्शन दुधाळ जनावरांना देऊन दूध विक्री केल्याने हे दूध पिणार्‍यांना अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.त्यामुळे प्रशासनाने तात्काळ कारवाई केली पाहिजे. अन्यथा आम्ही संघटनेतर्फे जनआंदोलन छेडू.
-दिनेश उघडे, अध्यक्ष, ग्राहक सेवा संस्था, ठाणे जिल्हा

ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा दुधासाठी वापर करणे गैर आहे. अशा दुधाचे नमुने घेऊन औषध प्रशासन अधिकार्‍यांच्या सहकार्याने या गंभीर प्रश्नी कारवाई करू
-भरत वसावे,निरिक्षक, अन्न प्रशासन ठाणे