रेल्वेत दरोडा टाकत बलात्कार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

फरार चार आरोपींना अटक, मुख्य संशयित आरोपीचा समावेश

Arrest Crime News
प्रातिनिधीक फोटो

इगतपुरी : धावत्या गाडीत जबरी लुटमार व महिलेवर बलात्कार करणार्‍या टोळक्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अखेर यश आलं. या प्रकरणातील फरार चौघा संशयित दरोडेखोरांना पोलिसांनी आज अटक केली. मुख्य आरोपी राहुल आडोळे उर्फ राहुल्या (रा. टाकेघोटी) व काशिनाथ तेलंग (रा. घोटी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

या टोळक्याने शुक्रवारी (दि.८) लखनऊहून मुंबईला येणार्‍या पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून इगतपुरी ते कसारादरम्यान लुटले होते. एवढ्यावर न थांबता या टोळक्याने महिलांची छेड काढत एका विवाहितेवर बलात्कार केला होता. त्यावेळी पळून जाताना प्रवाशांनी मोठ्या हिंमतीने चौघांना पकडले होते. उर्वरित चौघे पळून गेले होते. इगतपुरी पोलिसांनी त्यातील फरार दोघांना सापळा रचून अटक केली, तर दोघे स्वत:हून पोलिसांत हजर झाले.

अटकेतील संशयित आरोपी इगतपुरी ते कसारा, कल्याण दररोज वेगवेगळ्या रेल्वेत फेरीवाले बनून प्रवास करत होते. त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे. पुढील तपास कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दूल करत आहेत.