बीड : केज तालुक्यामधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास फार वेगाने सुरू आहे. या हत्यप्रकरणी आरोप असलेला सूत्रधार वाल्मीक कराड हा पोलिसांना शरण आला आहे. मात्र वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने विरोधक पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे हेही देखील पोलिसांवर आरोप करत आहेत. अशातच एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने बजरंग सोनवणे यांचे नाव न घेता वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. याप्रकरणी आता सहाय्यक पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. (Police Assistant Inspector Ganesh Munde transferred for controversial post about Bajrang Sonawane)
संतोष देशमुख हत्येप्रकरणी बजरंग सोनवणे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिफळे यांच्यावर आरोप केले होते. बजरंग सोनवणे यांच्या आरोपानंतर गणेश मुंडे यांनी बीडमधील पत्रकारांसाठी तयार करण्यात आलेल्या एका एक व्हॉट्सअॅप ग्रुप वादग्रस्त पोस्ट टाकली. त्यांनी म्हटले की, ‘मी जर पत्रकार परिषद घेतली तर या खासदाराची चड्डी सुद्धा जागेवर राहणार नाही’. ही पोस्ट करताना त्यांनी बजरंग सोनवणे यांचे नाव घेणे टाळले. मात्र या पोस्टवर काही पत्रकारांनी विचारपूस केल्यानंतर गणेश मुंडे यांनी वादग्रस्त पोस्ट डिलीट केली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी गणेश मुंडेंना ग्रुपमधून बाहेर काढले होते. मात्र आता गणेश यांना त्यांची वादग्रस्त पोस्ट भोवल्याचे पाहायला मिळत आहे. कारण गणेश मुंडे यांची पुणे नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
हेही वाचा – Beed News : बीड पोलीस दलात मोठे फेरफार, अधीक्षक नवनीत कावत यांनी केल्या चार अधिकाऱ्यांच्या बदल्या
बजरंग सोनवणे यांचे गणेश मुंडेंना आवाहन
दरम्यान, गणेश मुंडे यांच्या वादग्रस्त पोस्टची बातमी समोर आल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी त्यांना आवाहन केले आहे. आज पुण्यात संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले की, माझी त्या अधिकाऱ्याला विनंती आहे की, तू एकदा पत्रकार परिषद घे.., त्यांनंतर तुला विविध ठिकाणी पोस्टिंग मिळण्याबाबत कोणाची मेहरबानी आहे, हे येणाऱ्या दोन दिवसांमध्ये समजून जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
हेही वाचा – Amol Mitkari vs Suresh Dhas : मिटकरींनी आमदार सुरेश धसांना म्हटले बैल, नेमके प्रकरण काय?