Corona Crisis: रुग्णवाहिकेतील लोकांना पोलिसांची मारहाण; चालकाच्या वडिलांचा मृत्यू

police beaten
प्रातिनिधिक छायाचित्र

करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून गावी परतण्याचे प्रमाण वाढले आहे. दूधाचा टँकर, रुग्णवाहिकेतूनही काही लोक प्रवास करत असल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. असाच एक प्रकार उर्से टोलनाक्याजवळ घडला असून या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बोरीवलीतून रुग्णवाहिकेने श्रीगोंदा येथे एका रुग्णाला सोडण्यासाठी जात असताना उर्से टोलनाक्यावर काही पोलिसांनी ही रुग्णवाहिका अडवली. नुसती अडवली नाही तर रुग्णवाहिका चालवणाऱ्या चालकाच्या वडीलांना मारहाण केली आणि मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

एका पोलिसाने चालकाच्या वडीलांना काठीने मारहाण केली. काही अंतर पुढे गेल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान उर्से टोलनाक्याजवळ ही घटना घडली आहे. ४९ वर्षीय नरेश शिंदे असं या मृत व्यक्तीचे नाव असून त्यांचा मुलगा निलेश शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.

नेमकं काय घडलं?

शिंदे यांची रुग्णवाहिका ठाणे सिव्हिल हॉस्पिटलसाठी कार्यरत आहे. गुरुवारी रात्री एका रुग्णाला घेऊन बोरीवलीतून नगर जिल्ह्यातील श्रीगोंदासाठी निघाले होते. प्रवासाचे अंतर एकट्याने पार पाडावे लागेल म्हणून निलेश आपले वडील नरेश यांना सोबत घेऊन निघाले. मुंबई ते पुण्यापर्यंत नरेश यांनी रुग्णवाहिका चालवली. पण, त्यांना झोप येत असल्यामुळे त्यापुढे निलेश यांनी रुग्णवाहिका चालवायला सुरूवात केली. दुपारी एकच्या दरम्यान, रुग्णवाहिका मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावरुन उर्से टोलनाक्यावर पोहोचली. तिथे उपस्थित असलेल्या वाहतूक पोलिसांनी दोघानांही खाली उतरायला सांगितले. त्यांनतर तिथल्याच एका वाहतूक पोलिसाने नरेश यांच्या पाठीत जोरात काठी मारली. तर, दुसऱ्या वाहतूक पोलिसाने निलेश यांना तुम्ही प्रवासी घेऊन जात असल्याचे म्हणत एका अधिकाऱ्याकडे नेऊन गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. मामला थंड व्हावा म्हणून पाच हजारांची मागणी केली. पण, नरेश यांच्याकडे पैसे नसल्याने शिवाय, रुग्णवाहिकेत रुग्ण आणि नातेवाईक असल्याने सर्व प्रकरण तीन हजारांत मिटवण्यात आले.

नरेश यांची रुग्णवाहिका साधी असल्यामुळे त्यात डॉक्टर्स नाहीत असं ही त्यांनी पोलिसांना सांगितले. पण, पोलिसांनी प्रवासी वाहून नेत असल्याचं सांगत त्यांच्या वडीलांना मारहाण केली आणि गुन्हा दाखल करु अशी धमकी दिल्याचं निलेश यांनी तक्रारीत म्हटले आहे. पुढे निलेश रुग्णवाहिका घेऊन चाकणच्या दिशेने गेला असता वडीलांची प्रकृती बिघडून त्यांनी तिथेच मान टाकल्याचं ही निलेश यांनी सांगितलं आहे. वडीलांना त्रास होत असल्यामुळे निलेशने वडीलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न केला. शेवटी शिक्रापूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. पण, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले.

हा सर्व प्रकार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजल्यानंतर चौकशीनंतर संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी स्पष्ट केलं आहे.