मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात सध्या राजकीय आणि सामाजिक दोन्ही पातळ्यांवर गाजत आहे. अशातच मराठा आरक्षणाचे अभ्यासक नामदेव जाधव यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे मराठा समाजावर आज आरक्षणासाठी आंदोलनाची वेळ आल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने थेट पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा – मुंबईतील प्रदूषणाच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे आक्रमक; म्हणाले- रस्ते धुणे हे त्याचे…
नामदेव जाधव यांनी अलीकडेच एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये त्यांनी मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यासाठी शरद पवार हेच जबाबदार असल्याचा दावा केला होता. मंडल आयोगापेक्षा मोठा घोटाळा शरद पवारांनी 23 मार्च 1983 रोजी केला. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यांनी लेवा पाटील, लेवा पाटीदार, लेवा कुणबी या जातींना एका ओळीचा आदेश काढून त्यांचा ओबीसीमध्ये समावेश केला. त्यासाठी त्यांनी आरक्षणाची मर्यादा 14 टक्क्यांवरून 30 टक्क्यांवर नेली, असे नामदेव जाधव यांनी म्हटले आहे.
— Vikas Lawande (@VikasLawande1) November 9, 2023
सुप्रीम कोर्टाची 50 टक्क्यांच्या मर्यादेपर्यंत आरक्षण शरद पवार यांनी नेले. यामुळे मराठ्यांच्या हक्काचे 16 टक्के आरक्षण डावलण्यात आले. मराठे हे 181 क्रमांकावर होते, त्यांच्या नावावर फुली मारून शरद पवारांनी 182 आणि 183 क्रमांकावरील तेली, माळी यांचा ओबीसी आरक्षणात समावेश केला. हे मराठ्यांच्या पाठीत खंजिर खुपसण्याचे काम शरद पवारांनी केले. चार वेळा शरद पवार मुख्यमंत्री होते, मात्र त्यांनी कधीही मराठ्यांचे भले केले नाही, असा आरोपही त्यांनी केला होता.
हेही वाचा – राहुल गांधी यांची जोरदार हवा, राजकीय सट्टेबाजांचा हवाला देत आव्हाड यांचा दावा
यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते विकास लवांदे यांनी पुणे जिल्ह्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जातीय तेढ निर्माण करणे, जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न करणे, शरद पवार यांची प्रतिमाहनन करून बदनामी करणे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून गृह विभागाकडून तत्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.